नवी दिल्ली : रविवारी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीचं (Ed Raid) तब्बल नऊ तास धाडसत्र चाललं. यादरम्यानच संजय राऊत यांची तब्बल 15 तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. मग रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टाने त्यांना तीन दिवसांची ईडीची कोठडी दिली आहे. यावरून गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उडवले आहे. अशातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ एक ट्विट केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक सूचक विधान केलं आहे. राजा का संदेश साफ है, जो मेरे खिलाफ बोलेगा, वो तकलीफे झेलेगा, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलंय. त्यामुळे सध्या ट्विटची सर्वात जास्त चर्चा आहे.
‘राजा’ का संदेश साफ़ है – जो मेरे खिलाफ़ बोलेगा, वो तकलीफें झेलेगा।
सरकारी एजेंसियों का दुरुपयोग करके विरोधियों का हौसला तोड़ने और सच का मुंह बंद करने की पुरज़ोर कोशिश जारी है।
लेकिन तानाशाह सुन ले, अंत में ‘सत्य’ जीतेगा, और अहंकार हारेगा। pic.twitter.com/ALPxZntAHd
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 1, 2022
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमधून पंतप्रधान मोदी आणि भाजपला नाव न घेता टोला लगावला आहे. राहुल गांधी यांच्या बारकाईने अर्थ काढल्यास त्याचा अर्थ असा होतो राजाचे आदेश स्पष्ट आहेत. जो माझ्या विरोधात बोलणार त्याला त्रास होणार, तपास यंत्रणांचा चुकीचा वापर करून विरोधकांचं तोंड बंद करण्याचा आणि त्यांचा आत्मविश्वास तोडण्याचा हा पुरेपूर प्रयत्न आहे. पण या तानाशहानं ऐकावं, शेवटी सत्याचा विजय होईल आणि अहंकार हरेल, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलंय.
काही दिवसांपूर्वीच ईडीने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांहीही चौकशी केली आहे. त्यावेळी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचे आणि सरकारविरोधात एल्गार पुकारल्याचे दिसून आले होते. देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते या चौकशीविरोधात रस्त्यावर उतरले होते. विरोधकांच्या मागे ईडीच्या चौकशी लावण्यावरून आता देशातलं राजकारण राऊतांच्या अटकेनंतर दिवसेंदिवस आणखी तापत आहे.