नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज केरळमधील वायनाड जागेवरुन आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. याबाबत काँग्रेसकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. राहुल गांधी त्यांच्या पारंपारिक उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघासह वायनाडच्या जागेवरुनही लोकसभा निडवणुकीच्या मैदानात उतरत आहेत.
2014 मध्ये राहुल गांधींची त्यांच्या बालेकिल्ल्यातच दमछाक झाली होती. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी त्यावेळी 23 दिवसांचा प्रचार करत 3 लाख मते मिळवली होती. अमेठी मतदारसंघातून जोरदार टक्कर देणाऱ्या स्मृती ईराणींनी यावेळी पुन्हा एकदा राहुल गांधींना आव्हान दिले आहे. त्यामुळे राहुल गांधींसाठी यावेळीही अमेठीत तारेवरची कसरत असेल. त्यामुळेच राहुल गांधींनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच 2 मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमधील कार्यकर्त्यांची वायनाड मतदारसंघातून लढण्याची मागणी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. अमेठीसाठी राहुल गांधींची उमेदवारी काँग्रेसच्या पहिल्या यादीतच जाहीर झाली होती.
काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यास राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील हे निश्चित आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचा उमेदवार सुरक्षित जागेवरुन लढावा यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. यासाठी केरळमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वायनाडमधून राहुल गांधींना लढवण्याचे ठरले आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला, मतदारसंघाचा इतिहास
1967 ला निर्मिती झालेला अमेठी मतदारसंघ हा नेहरु-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. 2014 पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसला जिंकण्यासाठी कधीही कसरत करावी लागली नाही. 1967 च्या पहिल्या निवडणुकीत विद्याधर वाजपेयी हे काँग्रेसचे अमेठीचे पहिले खासदार ठरले. त्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. काँग्रेसला या मतदारसंघात पहिला धक्का आणीबाणीनंतर झालेल्या म्हणजे 1977 च्या निवडणुकीत लागला. जनता पक्षाच्या रवींद्र प्रताप सिंह यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी यांचा पराभव केला. मात्र, 3 वर्षातच झालेल्या निवडणुकींमध्ये संजय गांधी हे मोठ्या फरकाने निवडून आले.
राहुल गांधी चौथ्यांदा अमेठी मतदारसंघातून उमेदवार
1980 च्या सार्वजनिक निवडणुकीनंतर काही दिवसातच संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्यांच्या जागी त्यांचे बंधू राजीव गांधी यांनी निवडणूक लढवली. या पोटनिवडणुकीत राजीव गांधी तब्बल सव्वादोन लाखांच्या फरकाने निवडून आले होते. राजीव गांधींनी या मतदारसंघातून सलग 4 वेळा निवडणूक जिंकली. राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसचे सतिश शर्मा हे सलग 2 वेळा म्हणजे 1998 पर्यंत अमेठीचे खासदार राहिले. भाजपने पहिल्यांदाच 1998 च्या निवडणुकीत अमेठीत खातं उघडलं आणि भाजपचे डॉ. संजय सिंग हे निवडून आले. 1999 ते 2004 या काळात यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी अमेठीतून निवडून आल्या. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींनी हा मतदारसंघ मुलगा राहुल गांधींसाठी सोडला आणि त्या रायबरेलीतून लढल्या. राहुल गांधींनी 2004, 2009 आणि 2014 ची निवडणूक अमेठीतून जिंकली. सध्या ते चौथ्यांदा या मतदारसंघातून उमेदवार आहेत.
राहुल गांधींचा 2014 मध्ये फक्त 1 लाख 7 मतांनी निसटता विजय
राहुल गांधी हे दशभरात सभा घेत असताना त्यांची बहीण प्रियांका गांधी या अमेठी आणि रायबरेलीची जबाबदारी सांभाळत असतात. सध्या त्या सक्रिय राजकारणात आल्या असल्या तरी त्यापूर्वीपासून त्यांनी या मतदारसंघांची धुरा सांभाळलेली आहे. पण काँग्रेसला अमेठी आणि रायबरेली या दोन जागांसाठी काही अपवाद वगळता कधीही संघर्ष करावा लागला नाही. दर निवडणुकीत लाखोंच्या फरकाने निवडून येणारे राहुल गांधी 2014 मध्ये फक्त 1 लाख 7 मतांनी निवडून आले. यानंतर 2017 मध्ये उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसने सपासोबत आघाडी केलेली असतानाही काँग्रेसचा अमेठीतून सुपडासाफ झाला.
व्हिडीओ पाहा: