नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना श्रीनगर विमानतळावरुन दिल्लीला परत पाठवण्यात आलं आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी काश्मीरमधील स्थिती सामान्य नसल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याचाही आरोप केला.
राहुल गांधी म्हणाले, “विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत आलेल्या पत्रकारांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये सामान्य स्थिती नाही हे स्पष्ट आहे.”
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या नेत्यांचे एक शिष्टमंडळ आज काश्मीर भेटीसाठी गेले होते. मात्र, त्यांना श्रीनगर विमानतळावर भेटीसाठी नकार देण्यात आला. तसेच तेथूनच त्यांना दिल्लीला परत पाठवण्यात आलं. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीर खोऱ्याला भेट देण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर राहुल गांधी शिष्टमंडळसह काश्मीरमधील स्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते.
शिष्टमंडळाला लोकांच्या भावना समजून घ्यायच्या होत्या. मात्र, आम्हाला विमानतळावरुन पुढे जाण्यापासून अडवले, असे मत राहुल गांधींनी दिल्ली विमानतळावर परत आल्यावर व्यक्त केले. ते म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल सिंग यांनी मला भेट देण्यासाठी आमंत्रित केलं होतं. आम्हाला लोक कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे समजून घ्यायचं होतं. मात्र, आम्हाला विमानतळावरच अडवण्यात आलं. पत्रकारांना देखील धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. त्यामुळे ही स्थिती नक्कीच सामान्य नाही.”
राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, के. सी. वेणुगोपाल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) नेते सिताराम येचुरी, डीएमकेचे (DMK) नेते तिरुची सिवा, लोकशाही जनता दलाचे (LJD) नेते शरद यादव, टीएमसीचे (TMC) दिनेश त्रिवेदी, कम्युनिस्ट पक्षाचे (CPI) नेते डी. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते माजीद मेनन, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते मनोज झा, जनता दल – धर्मनिरपेक्ष (JDS) नेते डी. कुपेंद्र रेड्डी हेही उपस्थित होते.
‘काश्मीरची स्थिती दगडालाही अश्रु फुटतील अशी’
गुलाम नबी आझद यांनी काश्मीरमधील स्थिती भितीदायक असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “आम्हाला शहरात जाऊ दिले नाही. शहरातील स्थिती भितीदायक आहे. काश्मीरमधील लोकांनी सांगितलेली परिस्थिती ऐकून दगडालाही अश्रू फुटतील.
विरोधीपक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला काश्मीरला भेट देण्याची परवानगी द्यायला हवी होती. शिष्टमंडळ काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार करण्यासाठी जात आहे असं म्हणणं बिनबुडाचं आहे, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांनी व्यक्त केलं.