नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या अमेठीतील पराभव चांगलाच जिव्हारी लागला. त्यातच आता त्यांना सरकारी बंगलाही सोडावा लागणार आहे. कारण, अमेठीतील पराभवामुळे राहुल गांधींचं निवासस्थान आता रिक्त बंगल्यांच्या यादीत आलंय. 12 तुघलक लेन हा बंगला राहुल गांधींना सोडावा लागेल. लोकसभा सचिवालयाकडून रिक्त बंगल्यांची यादी आली आहे, ज्यात राहुल गांधींचाही बंगला आहे. पराभवानंतर खासदारांना बंगला रिक्त करावा लागतो, हाच नियम राहुल गांधींनाही लागू होणार आहे.
राहुल गांधींनी केरळमधील वायनाडमधून विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा दुसरा सरकारी बंगला दिला जाऊ शकतो. राहुल गांधींचा सध्याच्या सरकारी बंगला ‘टाईप 8’ या कॅटेगरीत येतो. 2004 मध्ये राहुल गांधींना हा बंगला देण्यात आला होता. ‘टाईप 8’ बंगले दिल्ली लुटियनमध्ये सर्वोच्च श्रेणीचे मानले जातात. लुटियन म्हणजे दिल्लीतला तो भाग ज्याची रचना, ब्रिटीश वास्तूविशारद एडवर्ड लुटियन यांनी केली होती.
सरकारी बंगल्यांच्या वाटपावरुन नेहमीच वाद होतो. राहुल गांधींनी 2004 मध्ये पहिल्यांदा विजय मिळवला तेव्हा त्यांना हा शाही बंगला देण्यात आला होता. त्यापूर्वी ते काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा आणि आई सोनिया गांधी यांचं निवासस्थान 10, जनपथ रोडवर राहत होते. राहुल गांधींनी सर्वात अगोदर 12 तुघलक लेनला आपलं कार्यालय बनवण्याचा निर्णय घेतला होता.
लोकसभा पूलमध्ये एकूण 517 घरं आहेत, ज्यात टाईप-8 बंगल्यापासून ते छोट्या फ्लॅटचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नव्या लोकसभा अध्यक्षाच्या निवडीनंतर पहिली समिती नियुक्त केली जाईल आणि घरांचं वाटप होईल. सध्या 250 नव्या खासदारांचा निवास विविध राज्यांची भवने आणि वेस्टर्न कोर्टात आहे.
लोकसभा पूलमध्ये राहण्याच्या ठिकाणांमध्ये 159 बंगले, 37 ड्युअल फ्लॅट, 193 सिंगल फ्लॅट, 96 बहुमजली इमारतीमध्ये आणि 32 घरं विविध ठिकाणी आहेत. सेंट्रल दिल्ली, नॉर्थ एवेन्यू, साऊथ एवेन्यू, मीना बाग, बिशम्बर दास मार्ग, बाबा खडक सिंह मार्ग, टिळक लाईन आणि विठ्ठल भाई हाऊसमध्ये ही घरं उपलब्ध आहेत. सर्व विद्यमान खासदारांना घर खाली करण्यासाठी 24 मेपासून एक महिन्याचा कालावधी देण्यात आलाय.
टाईप-5 निवासस्थानांमध्ये चार श्रेणी आहेत. टाईप-5 (ए) एक ड्रॉईंग रूम आणि एक बेडरूम सेट, टाईप-5 (बी) एक ड्रॉईंग रूम आणि दो बेडरूम सेट, टाईप-5 (सी) ड्रॉईंग रूम आणि तीन बेडरूम सेट, तर टाईप-5 (डी) ड्रॉईंग रूम आणि चार बेडरूम सेट आहे. संयुक्त फ्लॅट टाईप-(ए/ए), संयुक्त फ्लॅट टाईप-5 (ए/बी) आणि संयुक्त फ्लॅट टाईप-5 (बी/बी) उपलब्ध आहे.
संबंधित बातम्या :