Maharashtra Assembly | विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन उपस्थित

| Updated on: Jul 01, 2022 | 4:54 PM

राहुल नार्वेकर कुलाबा मतदार संघाचे आमदार आहेत. 2016 मध्ये राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांमध्ये त्यांना संधी देण्यात आली होती. यापूर्वी ते शिवसेनेत होते.

Maharashtra Assembly | विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन उपस्थित
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबईः विधानसभा अध्यक्षपदाच्या (Assembly Speaker) निवडणुकीसाठी भाजपकडून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्षपदाच्या या शर्यतीत राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांचं नाव चर्चेत होतं. मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाकडून या पदासाठी तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. आज चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. विरोधी पक्षाकडून अद्याप या पदासाठी कुणीही अर्ज दाखल केलेला नाहीये. विधानसभेतील भाजप आणि मित्र पक्षांचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर यांची निवड झाली तर ते सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरतील.

विशेष अधिवेशनात निवड

विधानसभेचं विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै रोजी बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवनियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांचीदेखील निवड केली जाणार आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची या पदासाठी निवड होते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागल्यानंतर विधान सभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्तच होतं. तेव्हापासून उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हेच अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरे सरकारने वारंवार विनंती करूनही त्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र आता नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे पद भरण्यासाठीचीही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

कोण आहेत राहुल नार्वेकर ?

राहुल नार्वेकर कुलाबा मतदार संघाचे आमदार आहेत. 2016 मध्ये राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांमध्ये त्यांना संधी देण्यात आली होती. यापूर्वी ते शिवसेनेत होते. 2014 मध्ये शिवसेनेनं त्यांना लोकसभेचं तिकिट नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूकीत पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला. भाजपच्या तिकिटावर कुलाबा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. राहुल नार्वेकर हे कुलाब्यातील माजी नगरसेवक सुरेश नार्वेकर यांचे पुत्र आहेत .सुरेश नार्वेकर हे शिवसैनिक होते.  राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत.