मुंबई : ISO मानांकन मिळवणारे देशातले पहिले शिवसेना खासदार म्हणून राहुल शेवाळे ठरले आहेत. दक्षिण-मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना ISO मानांकन मिळाल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानींही राहुल शेवाळे यांचे कौतुक केलं. प्रभावी आणि जलद तक्रार-निवारण व्यवस्थापन, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी डिजिटल पद्धतीचा वापर आणि सरकारी योजनांविषयीची प्रभावी जनजागृती केल्यामुळे शेवाळे यांच्या चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयाला ISO मानांकन प्राप्त झाले.
“खासदार किती उत्कृष्टरित्या काम करू शकतो यांचं उत्तम उदाहरण असलेले खासदार राहुल शेवाळे येत्या 5 वर्षात चौपट काम करतील” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शेवाळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. खासदार शेवाळे यांच्या, मातोश्री इथे पार पडलेल्या कार्यअहवालाच्या ई-प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
शिवसेनेचे कार्य घराघरांत पोहोचवणाऱ्या गटप्रमुखांसाठी मोफत अपघाती विमा योजनेची तरतूद शेवाळे यांनी केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विभागप्रमुख सदा सरवणकर आणि मंगेश सातमकर यांना या मोफत विमा योजना पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.
गटप्रमुखांसाठी मोफत विमा योजना
पक्षाच्या बांधणीत आणि जडण-घडणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना गटप्रमुखांसाठी, खासदार राहुल शेवाळे यांनी मोफत विमा उतरविला आहे. यामुळे गटप्रमुखांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
“प्रत्येक शिवसैनिकाचं स्फूर्तिस्थान असलेल्या मातोश्री इथे उद्धव ठाकरेंच्या हस्ते कार्यअहवालाचे प्रकाशन होणे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या सोहळ्याला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो”, असं राहुल शेवाळे म्हणाले.
व्हिडीओ : आम्ही निवडणुकांसाठी तयार : उद्धव ठाकरे