मुंबई : राज्यातील सत्तापालटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शेवाळे यांच्यावर एका महिलेने फसवणुकीचा आरोप केला होता. या महिलेनं शेवाळेंवर बलात्काराचा आरोप केलाय. साकीनाका पोलिसांकडे (Sakinaka Police) या महिलेनं तक्रार दिलीय. मात्र, या प्रकरणातून शेवाळे यांना दिलासा मिळाला आहे. या महिलेविरोधातच साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीवसूल करण्याच्या इराद्याने या महिलेने आरोप केल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे. दरम्यान, शेवाळे यांच्याविरुद्ध एका युवतीने दाखल केलेल्या तक्रारीबाबत साकीनाका पोलीस ठाणे , मुंबई यांच्याकडून कारवाई होत नसल्यामुळे या युवतीने राज्य महिला आयोगाकडे (State Womens Commission) दाद मागितली होती. त्याबाबत आज राज्य महिला आयोगाच्या मुंबई येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली.
राज्य महिला आयोगाने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, अर्जदार युवतीला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्या मुंबईत येऊ शकत नाहीत असे कळविल्याने त्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज आपली बाजू मांडली.एप्रिल 2022 पासून ही तरुणी पोलिसांनी तिची तक्रार घ्यावी म्हणून सातत्याने विनंती करूनही पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचे तसेच राजकीय दबावामुळे कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे सदर तक्रारीबाबत साकीनाका पोलीस कारवाई करण्यास सक्षम नसल्याचे आयोगाकडून नमूद करण्यात आले आहे. यासंबंधी वरिष्ठ स्तरावरून तपास करण्यात यावा त्यासंबंधी मुंबई पोलीस आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन याबाबतीत योग्य ती कारवाई करण्यात यावी असे पत्र पाठविण्यात आले आहे, असं राज्य महिला आयोगाने सांगितलं.
अर्जदार युवतीला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्या मुंबईत येऊ शकत नाहीत असे कळविल्याने त्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज आपली बाजू मांडली.एप्रिल 2022 पासून ही तरुणी पोलिसांनी तिची तक्रार घ्यावी म्हणून सातत्याने विनंती करूनही(2/4)
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) August 4, 2022
काही दिवसांपूर्वी एका महिलेनं राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. त्या महिलेनं आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. संबंधित महिलेनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केलीय. इतकंच नाही तर माझी विनंती ऐकली नाही आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही तर आपल्यासमोर आयुष्य संपवण्याशिवायी पर्याय नसल्याचा इशाराही त्या महिलेनं पत्राद्वारे दिला आहे. अशावेळी राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे या ठामपणे पतीच्या मागे उभ्या असल्याचं पाहायला मिळतंय. सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या 25 वर्षांहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप कामिनी शेवाळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्या महिलेवर केलाय.
सदर महिलेने गेल्या काही महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने धमकावणे, प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे यासाठी सदर महीले विरोधात शारजा, दुबई येथे देखील काही महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि तिला सुमारे 80 दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तसेच सदर महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याप्रकरणी सदर महिलेचा भाऊ दिल्लीतील तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची देखील माहिती आहे.