125 ट्रेन्सची यादी कुठे? रेल्वेमंत्र्यांचा मध्यरात्री उद्धव ठाकरेंना प्रश्न, पहाटे दोनपर्यंत ट्वीटवर ट्वीट

| Updated on: May 25, 2020 | 11:54 AM

मी अधिकाऱ्यांना वाट पाहत तयारी सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असे ट्वीट पियुष गोयल यांनी मध्यरात्री सव्वाबारा वाजता केले होते. (Rail Minister Piyush Goyal asks CM Uddhav Thackeray list of Trains)

125 ट्रेन्सची यादी कुठे? रेल्वेमंत्र्यांचा मध्यरात्री उद्धव ठाकरेंना प्रश्न, पहाटे दोनपर्यंत ट्वीटवर ट्वीट
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये रंगलेलं ट्विटर युद्ध चांगलंच पेटलं आहे. “पहाटेचे 2 वाजले. 125 श्रमिक स्पेशल ट्रेन्स सोडण्याची आपली तयारी असताना फक्त 46 ट्रेनची यादी आपल्याला मिळाली” असा दावा करत रेल्वेमंत्री गोयल यांनी ठाकरे सरकारकडे बोट दाखवलं. (Rail Minister Piyush Goyal asks CM Uddhav Thackeray list of Trains)

“महाराष्ट्रातील 125 रेल्वेगाड्यांची यादी कुठे आहे? मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मला फक्त 46 गाड्यांची यादी मिळाली असून त्यापैकी 5 पश्चिम बंगाल किंवा ओदिशाकडे जाणाऱ्या आहेत. परंतु चक्रीवादळ अम्फानमुळे त्या तूर्तास धावू शकत नाहीत.” असा दावा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी 2 वाजून 11 मिनिटांनी ट्विटरवर केला. “125 रेल्वेगाड्यांच्या तयारीत असूनही आम्ही आज केवळ 41 गाड्या सोडत आहोत” अशी पुष्टी त्यांनी जोडली.

“रात्रीचे 12 वाजले असून पाच तासानंतरही आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून उद्याच्या 125 गाड्यांचा तपशील आणि प्रवासी यादी मिळाली नाही. मी अधिकाऱ्यांना वाट पाहत तयारी सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.” असे ट्वीट पियुष गोयल यांनी मध्यरात्री सव्वाबारा वाजता केले होते.

हेही वाचा : पियुष गोयल यांनी यादी मागितली; संजय राऊत म्हणाले, यादी घ्या पण रेल्वे योग्य स्टेशनला पोहोचवा

“माझी विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने आम्हाला पुढच्या एका तासात किती गाड्या, गंतव्य स्थान आणि प्रवाशांच्या याद्या पाठवाव्यात. आम्ही उद्याच्या गाड्यांची तयारी करण्यासाठी रात्रभर थांबलो आहोत. कृपया पुढील तासात प्रवासी याद्या पाठवा” असेही त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही आम्हाला पुढील एका तासात मजुरांची यादी द्या. तुम्ही जितक्या ट्रेन सांगाल, तितक्या ट्रेन उपलब्ध करुन देऊ,” असे ट्वीट पियुष गोयल यांनी संध्याकाळी सव्वासातला केले होते.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारकडून ट्रेन सोडण्यात येत आहे. मात्र त्यावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना केंद्राकडून मागणीपेक्षा कमी रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत, अशी टीका केली होती. या टीकेवर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी प्रत्युत्तर दिले.

संजय राऊत यांचा निशाणा

रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवरुन संजय राऊत यांनीही निशाणा साधला होता. “महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोहोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओदिशाला पोहोचू नये,” असे संजय राऊत मिश्किलपणे म्हणाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

“राज्य शासनाला श्रमिकांचे ओझे नव्हते पण ते मजूर घरी जाऊ इच्छित होते. त्यांना ट्रेनच्या माध्यमातून घरी जाण्याची मान्यता मिळाल्यानंतर सुमारे 7 लाख मजूर 481 ट्रेन्सच्या माध्यमातून त्यांच्या राज्यात गेले. त्यांच्या प्रवासी भाड्याची 85 टक्के रक्कम केंद्र सरकार राज्याला देईल तेव्हा देईल. पण त्याआधी राज्य शासनाने मजुरांच्या प्रवास शुल्कासाठी 100 टक्के खर्च करत केला. आतापर्यंत 85 कोटीहून अधिक रक्कम खर्च केली आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

“राज्याची रोज 80 ट्रेन सोडण्याची मागणी असताना केवळ 30 ते 40 ट्रेन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मजुरांची व्यवस्थित नोंदणी करून त्यांना चांगल्या पद्धतीने पाठवले जात आहे. त्यामुळेच परराज्यातील हे मजूर महाराष्ट्राचा जयजयकार करत परतत आहेत,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. (Rail Minister Piyush Goyal asks CM Uddhav Thackeray list of Trains)