मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलाय. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जातंय. उत्तर मध्य मुंबईसाठी अभिनेत्री नागमा, नसीम खान, माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन आपलं नशिब आजमावत असले तरी राज बब्बर यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. या मतदारसंघात 24 टक्के अल्पसंख्यांक मतदार आहे.
जातीय समीकरणे लक्षात घेत काँग्रेसकडून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. त्यातच राज बब्बर यांचं नाव आघाडीवर आहे. वरिष्ठांनी राज बब्बर यांच्याच नावाला पसंती दिल्याचं बोललं जातंय. राज बब्बर सध्या उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. शिवाय ते राज्यसभेचे खासदारही आहेत.
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातलं चित्र
राज बब्बर यांचं नाव निश्चित झाल्यास त्यांची लढत भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याशी होईल. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, ज्याला एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटलं जायचं. या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्ता 2005 पासून निवडून येत होत्या. पण 2014 ला आलेल्या मोदी लाटेत भाजपच्या पूनम महाजन येथून निवडून आल्या. यावेळी प्रिया दत्त यांनी निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
भाजपसाठी हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. पण या मतदारसंघातलं गणित युतीवर अवलंबून असेल. मतदारसंघात अनेक स्थानिक मुद्दे आहेत. विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याकडे युवा मोर्चाची जबाबदारी आहे. त्यामुळे युवा वर्गापर्यंत पोहोचण्यास त्यांना मदत झाली आहे. शिवाय दिग्गज नेते प्रमोद महाजन यांची त्या कन्या आहेत. मोदी लाटेत त्यांचा विजय झाला. पण यावेळी युती न झाल्यास पूनम महाजनांना संघर्ष करावा लागणार आहे. कारण, मराठी मतांच्या विभाजनाचा फायदा थेट काँग्रेसला होईल.
2014 ला काय झालं होतं?
2014 च्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा सुपडासाफ केला होता. पूनम महाजन यांनी एकूण 56.60 टक्के म्हणजेच 4 लाख 78 हजार 535 मतं मिळवली होती. तर प्रिया दत्त यांना केवळ 2 लाख 91 हजार 764 मतं मिळाली. यावेळी मोदी लाट ओसरल्याचं चित्र आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राखण्यासाठी पूनम महाजन यांना राज बब्बर यांना टक्कर द्यावी लागेल.