मुंबई : लोकसभा निकालानंतर सगळ्यांना पडलेला एकच प्रश्न म्हणजे भाजपला एवढ्या जागा मिळाल्या कशा. महाराष्ट्रापुरतं म्हणायचं झालं तर राज ठाकरे यांनी मोदींविरोधात उघडलेला मोर्चा आणि वंचित आघाडीनं प्रस्थापितांसमोर उभं केलेलं आव्हान पाहता, राज्यात तरी भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. जागा कमी होणं तर दूरच त्या उलट वाढल्या. मग राज आणि वंचितच्या सभांना गर्दी करणारी मतं गेली कुठे?
लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत प्रत्येकाला दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या राज ठाकरे यांच्या राज्यात 10 सभा झाल्या. मुंबई, भांडुप, नांदेड, पुणे, पनवेल,सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये राज ठाकरेंनी सभा गाजवल्या.
‘मेरी बात सबूत के साथ’ असं सांगत राज यांनी या सभांमधून मोदी शाह यांच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. केवळ राज्यातच नाही तर राष्ट्रीय पातळीवरही राज यांच्या सभेतील गर्दी दखल घेण्याजोगी होती. तरुण, महिला, ज्येष्ठ असे सारेच त्यांच्या सभांना उपस्थित राहायचे. लोकसभा निवडणुकीतला हा मनसे फॅक्टर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निकालात मोलाची भर टाकणार असा सगळ्यांचाच अंदाज होता. मात्र लोकसभेचा निकाल लागला आणि राज यांची ही सगळी मेहनत, सगळी तळमळ वाया गेल्याचं दिसून आलं.
राज ठाकरेंनी ज्या 10 मतदारसंघात सभा घेतल्या त्यापैकी 8 मतदारसंघात शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार निवडून आले. मोदी यांच्या प्रमाणेच राज यांच्या भाषणाचे अनेक फॅन्स आहेत. त्यात तरुणाईचा वाटाही मोठा आहे. मात्र मोदींप्रमाणे राज यांच्यावरील प्रेम मतांमध्ये रुपांतरीत कधीच झालं नाही. राज यांनी लोकांपुढे मोठ्या तळमळीनं मांडलेले मुद्दे, सादर केलेले पुरावे यांना केवळ टाळ्या आणि शिट्ट्या एवढीच किंमत राहिली.
वंचित बहुजन आघाडी
राज यांच्याप्रमाणेच लोकसभेत सर्वाधिक चर्चा झाली ती वंचित बहुजन आघाडीची.प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या या आघाडीनं अनेकांना धडकी भरवली. शिवाजी पार्कवरील गर्दी आजवर केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसाठी झालेली आपण पाहिली होती. यावेळी ही गर्दी वंचितच्या बाळासाहेबांसाठी झाली होती. त्यामुळे यंदाच्या लोकसभेतील मुकाबला हा भाजप विरुद्ध वंचित आणि राजसमर्थकांचा असेल असं वाटत होतं. मात्र मनसेप्रमाणे या गर्दीचंही मतांमध्ये रुपांतर झालं नाही. वंचितनं काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडले खरे, मात्र 48 जागांचा दावा करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना स्वतःचा बालेकिल्ला असलेली अकोल्याची जागाही टिकवता आलेली नाही.
दुसरीकडे कोणी कितीही कडवं आव्हान उभं केलं, तर शत प्रतिशत भाजपच येणार असा विश्वास मोदी-शाह यांना होता.
मोदींच्या सभेला जे गर्दी करतात ते त्यांना मतं देतात. काँग्रेसचा मतदार रॅलीत दिसत नसला तरी तो बांधिल आहे. मात्र राज आणि वंचितच्या सभांना जाणारा मतदार कोणाकडे वळणार याची कोणालाच कल्पना नव्हती. 2014 मधील मोदी लाट अनेकांना मान्य होती. मात्र 2019 मध्येही त्याची पुनरावृत्ती होईल असं कोणालाही वाटलं नाही. राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना होणारी गर्दी मतात रुपांतरीत झालीच नाही, हे निकालावरुन सिद्ध होत आहे.