सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. सांगलीच्या इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र (Session Court) न्यायालयानें राज ठाकरे यांचे वॉरंट रद्द केले आहे. या अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली आहे. तर कोर्टात ज्यावेळी कोर्ट निर्देश देईल त्यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हजर राहावे. असे सुनावणी वेळी कोर्टाने म्हंटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात विविध आंदोलनातल्या अनेक केसेस दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी रेल्वे भरतीच्या (Railway Bharti) परीक्षेवरून मनसेने आक्रमक होत उत्तर भारतीयांविरोधात एल्गार पुकारला होता. त्यामुळे देशभरात मोठा पॉलिटिकल राडाही झाला होता. त्यात आंदोलनामुळे राज ठाकरे यांना अलिकडेच आपला अयोध्या दौरा हा भाजप खासदाराच्या विरोधामुळे स्थगित करावा लागला होता. हेही तेच रेल्ले आंदोलनाचे प्रकरण आहे. ज्यात सध्या तरी त्यांना दिलासा मिळाला आहे.
सन 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर सन 2008 मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसेतर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आलं होतं. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेण्यात आले होतं. त्यामुळे महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता. यावेळी सांगलीच्या शिराळा मध्ये मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून राज ठाकरे, तानाजी सावंत आणि काही जाणांवर हे गुन्हे दाखल झाले होते.
गेल्या काही वर्षात मनसेच्या खळखट्याकच्या भूमिकेमुळे राज ठाकरे सर्वात जास्त चर्चेत राहिले. कोणतेही आंदोलन असो मनसेकडून तोडफोड ही ठरलेलीच असाची, त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह हजारो मनसे कार्यकर्त्यांवर एक दोन ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. यातली अनेक प्रकरणं ही अजूनही न्याप्रविष्ठ आहेत. मात्र आतापर्यंतच्या कुठल्याही प्रकरणात राज ठाकरे यांना जास्त काळ अटकेत राहवं लागलं नाही. आता काही दिवसांपूर्वी त्यांच्या नावे वॉरंट निघाल्याने त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता कोर्टाने हे वॉरंट रद्द करून त्यांना आणि मनसे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र त्यांना कोर्ट सांगेल तेव्हा ऑनलाईन तरी हजर राहवेच लागणार आहे.