Raj Thackeray On Maratha Reservation : गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलं आहे. या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. आता यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता राज ठाकरेंनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षणावरुन एक रोखठोक सवाल विचारला आहे.
“मी 2006 रोजी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आमची एकच भूमिका राहिली आहे, ती म्हणजे आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिक निकषावर द्या. त्या उपर राज्याला आरक्षणाची गरज नाही. कारण या राज्यात शिक्षणापासून, उद्योग आणि इतर गोष्टी उपलब्ध आहेत. नोकऱ्या आहेत. बाहेरच्या राज्यातील लोकांना या गोष्टी मिळतात. ते येऊन घेतात. त्याच गोष्टी आपल्या लोकांना दिल्या तर आरक्षणाची गरज उरणार नाही”, असे राज ठाकरे म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
“बाबासाहेब आंबडेकर, त्यांच्या आधी ज्योतिराव फुले त्याआधी शाहू महाराज. खरं तर आरक्षण ही गोष्ट दुर्बल घटकांना या गोष्टी द्याव्यात हे शाहू महाराजांनी सांगितलं ते सुरू झालं. पण आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला आहे, त्याला आऱक्षण द्यावं. त्याच्या ऐवजी आपल्याकडे फक्त जातीचं राजकारण केलं जातं. जातीच्या राजकारणातून माथी भडकवली जाते. माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा काहीच संबंध नव्हता. त्यांचा विषयही नाही. त्यांच्या आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे सारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करत आहेत, जे मला मराठवाड्यात दिसतंय, तुमचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल तर तुम्ही राजकारण करताना त्या पद्धतीने बोला. समाजात कशाला भांडण लावत आहात”, असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला.
“2004 किंवा 2005 असेल तेव्हा पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा आला होता. मुंबईत मोर्चा आला होता. माझ्याकडे या मोर्चाचा फोटो असेल. या मोर्चाच्या व्यासपीठावर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोकं होते. सर्वांनी सांगितलं मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. कुणी अडवलं. तुमचं एकमत आहे तर थांबवलं कुणी? 15-20 वर्ष झाले. तुम्ही आरक्षण का दिलं नाही”, असा प्रश्नही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
“मोदी दहा वर्षापासून संसदेत आहे. मोदी म्हणाले शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो. मग शरद पवार यांनी मोदींना मराठा आरक्षणाबाबत शब्द का टाकला नाही. उद्धव ठाकरे भाजपसोबत होते, तेव्हा त्यांनी पाच वर्षात मराठा आरक्षणासाठी शब्द का टाकला नाही? जरांगेंच्या मागून राजकारण करत आहेत. तुमचं राजकारण लखलाभ असो. पण माझ्या नादी लागू नका. एवढंच सांगायचं आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.