Raj Thackeray on Ward | प्रभाग रचनेवरुन (Ward Formation) सध्या राज्यात राजकारण तापलं आहे. तीन सदस्यीय, चार सदस्यीय प्रभाग रचनेवरुन येईल ते सरकार आपला-आपला अजेंडा राबवत आहे. यापूर्वीच्या सरकारचे आदेश झटकन रद्द करत दुसरे सरकार नवीन प्रभाग रचनेचा निर्णय घेत आहे. नेमचा हाच धागा पकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला शाब्दिक फटकारे लगावले. चार चार नगरसेवकांचा प्रभाग हवाच कशाला? असा सवाल राज ठाकरे यांनी मंगळवारी केला. प्रभाग रचनेवरुन सातत्याने नवनवीन निर्णय घेणाऱ्या सरकारला (State Government) धारेवर धरले. प्रभाग रचनेवरुन राज ठाकरे यांनी सरकारला जाब विचारला आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी प्रभाग रचनेवरुन तोफ डागत नागरिकांना कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचे आवाहन केले होते.
राज ठाकरे यांनी निवडणुका कधी होतील याविषयी भाष्य केले आहे. निवडणुका कधी होतील माहीत नाही. अग अग म्हशी हेच चालू आहे. निवडणुका कधीही लागतील. दिवाळीच्या आधी लागतील असं वाटत नाही. नोव्हेंबर, डिसेंबर कदाचित जानेवारी आणि फेब्रुवारीतही निडवणुका होऊ शकतात. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या. सगळा चिखल झालाय. कारण कोणी विचारणारा नाही, असा टोला ही त्यांनी लगावला.
प्रभाग रचना आणि चार चार नगरसेवकाचं नेमकं गणित काय, याचा उलगडा राज ठाकरे यांनी केला आहे. महापालिका तीनचं की दोनचं. वॉर्डाला तीन माणसं चार माणसं कशाला? असा सवाल त्यांनी केला. लोक काय गुलाम आहेत का. त्यांना नगरसेवकही माहीत नसतं. चार चार माणसांचा प्रभाग करताय. तो भाग कोणी बघायचा. कुणाला कळत नाही. कुठे जावं. कारण लोक जाब विचारत नाही. एकदा लोकांनी ठरवलं पाहिजे. सरकारने हा नुसता खेळ मांडला आहे. लोकांना गृहित धरण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तीन-चारचा एकच प्रभाग करा अशी आग्रही मागणी त्यांनी पुन्हा केली. हा सर्व प्रकार नेमका कशासाठी करण्यात येतो, हे आज लक्षात नाही आलं तरी काही वर्षानंतर लक्षात येईल. महाराष्ट्र कसा होता आणि राजकारण्यांनी त्याचं कसं मातेरं केलं ते कळेल, असे ते म्हणाले.
मुंबईतील प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला. तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांआधी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज ते आज पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात बोलले.