मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी त्यांनी आंदोलन हाती घेतलं. तसंच अयोध्या दौऱ्याची घोषणाही केली. मात्र, एका शस्त्रक्रियेमुळे (Operation) अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केली होती. शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे रुग्णालयात दाखलही झाले. मात्र, तिथे त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांच्या शरिरात कोरोनाच्या मृत पेशी (Corona dead Cells) आढळून आल्या. त्यामुळे राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आता 14 जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. अशावेळी कुणीही शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी येऊ नये. कारण भेटीगाठीतून संसर्ग वाढला तर पुन्हा शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागेल, असं आव्हान राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलंय. त्याची एक ऑडिओ क्लिपही त्यांनी जारी केली आहे.
त्यादिवशी आपली पुण्याला जी सभा झाली. त्यावेळी सर्वांना सांगितलं की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. जेव्हा मी रुग्णालयात दाखल झालो आणि सगळ्या चाचण्या झाल्या आणि रात्री मला डॉक्टरांनी सांगितलं की कोविडचा डेड सेल आहे. आता ते काय असतं हे मलाही माहिती नाही आणि कुणालाही माहिती नाही, असो… आणि मग ती शस्त्रक्रिया रद्द झाली. आता परत करायची… त्यानंतर मी आता कोविडनंतर साधारणपणे 10, 12, 15 दिवस क्वारंटाईनमध्ये असतो आपण, त्याप्रमाणे घरी आहे. या सगळ्या दरम्यान 14 तारखेला माझा वाढदिवस आलाय. आपण सर्वजण दरवर्षी माझ्या वाढदिवसाला मला भेटायला येत असता, मी ही आपली आतुरतेने वाट पाहत असतो, सर्वांना भेटून बरंही वाटतं. पण यावेळी 14 तारखेला मला वाढदिवसाला कुणाला म्हणजे कुणालाही भेटता येणार नाही. याचं कारण परत गाठीभेटीमध्ये परत संसर्ग झाला आणि परत शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली तर ती किती पुढे ढकलावी यालाही काही मर्यादा असतात. पुढील आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरलेली आहे. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. म्हणून मी 14 तारखेला कुणालाही न भेटण्याचा निर्णय केलेला आहे. आपण जिथे आहात तिथेच राहा. माझी शस्त्रक्रिया होईल, जरा बरं वाटायला लागेल तेव्हा आपल्याला निश्चित भेटेन. पण 14 तारखेला आपण कृपया कुणी घरी येऊ नये ही विनंती करण्यासाठी आपल्याशी बोलतोय.
महाराष्ट्र सैनिकांना आवाहन… pic.twitter.com/Eed0DzRGgg
— Raj Thackeray (@RajThackeray) June 12, 2022
राज ठाकरे यांच्यावर 1 जून रोजी लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार होती. त्यासाठी ते रुग्णालयात दाखलही झाले. त्यावेळी शस्त्रक्रियेपूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यांच्या शरिरात कोरोनाच्या मृत पेशी आढळून आल्या. त्यामुळे त्या दिवशीची त्यांच्यावरील शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली. आता राज ठाकरे यांच्यावर पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे 14 जून रोजी वाढदिवसाला कुणीही भेटायला येऊ नये, असं आवाहन त्यांनी केलंय.
राज्य ठाकरे यांनी पुण्यातील सभेत आपल्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं सांगितलं होतं. ‘मी जेव्हा मागे पुण्यात आलो होतो, तेव्हाच मला पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला होता. जेव्हा मी मुंबईत परतलो तेव्हा काही टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये मला हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. एक जूनला शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. म्हणूनच मी मुद्दामहून तुम्हाला याबद्दल माहिती दिली. तुम्हाला न सांगताच शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलो तर पत्रकार काहीही सांगू शकतात, असे म्हणत त्यांनी पत्रकारांना टोला लगावला होता.