मुंबई : ‘नोटाबंदी आणि जीएसटीमुळे पार विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ‘रिझर्व्ह’चं ठिगळ लागणार, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेलं भाकित खरं ठरलं, असं ट्वीट मनसेने केलं आहे. 9 ऑगस्टला राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत हा दावा करण्यात आला आहे.
देशातील आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे विविध क्षेत्रात मंदीची चाहूल लागली आहे. काही कर्मचाऱ्यांवर रोजगारापासून मुकण्याची वेळ आली आहे. आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी केंद्राने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 1 लाख 76 हजार कोटी रुपये घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे.
विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली असताना मनसेनेही यात उडी घेतली आहे. राज ठाकरेंनी 9 ऑगस्टच्या कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या भाषणाची आठवण करून देत मनसेने केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. पैसेरहित अर्थक्रांतीला सुरुवात झाल्याचं मनसेने शेअर केलेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला म्हटलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
आरबीआयकडून पैसे घेऊन देश चालवायला लागत आहे. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तिथे पैसे रिझर्व्ह म्हणजे राखीव ठेवले जातात. समजा, एखाद्या बँकेने तुमचे पैसे बुडवले तर त्यासाठी हमी म्हणून रिझर्व्ह बँक असते. लोकांना याचा त्रास होऊ नये म्हणून. जर त्याच रिझर्व्ह बँकेतून सरकार पैसा काढणार असेल तर उद्या बँका डबघाईला आल्यावर तुम्हाला कोण पैसे देणार? तुमचे पैसे कुठून मिळणार आहेत?
तुम्हाला वाटलं म्हणून एका दिवशी तुम्ही नोटा बंद केल्यात. लोकांना रांगेत उभं केलं, अनेक माणसं त्यामध्ये गेली. जीएसटी लागू केला, तेवढे पैसे केंद्र सरकारला येत नाहीत. केंद्राला नाहीत म्हणजे राज्य आणि महानगरपालिका ते गोळा करु शकणार नाहीत.
देशात जे घडत आहे, ते ठीकठाक करायला काय करायचं तेच यांना माहित नाही. ते रोज गोत्यात येत आहेत. त्याच्यावरुन लक्ष हटवण्यासाठी ते वेगवेगळ्या गोष्टी समोर आणत आहेत. उद्या समान नागरी कायदा आणतील, मग राम मंदिर आणतील, मग आम्ही फटाके वाजवणार, पेढे वाटणार, नाचणार. कालांतराने कळणार हाती काहीच लागलं नाही, असं राज ठाकरे म्हणाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
‘नोटबंदी आणि जीएसटीमुळे पार विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला रिझर्व्ह बँकेच्या ‘रिझर्व्ह’चं ठिगळ लागणार’… हे राजसाहेबांचं ९ ऑगस्ट २०१९ चं भाकीत खरं ठरलं! pic.twitter.com/5Lv4pA35de
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) August 27, 2019