मुंबई : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलंय. पक्षातील वाद सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करणाऱ्यांचे राज ठाकरे यांनी यावेळी चांगलेच कान उपटले. ते म्हणाले की, ‘पदाधिकाऱ्याने पदाधिकाऱ्याने पक्षातल्या पक्षात व्हॉट्सअप सोशलम मीडियात फेसबुकवर कोणत्याही प्रकारच्या कमेंट केल्या तर त्याला एकक्षणही पक्षात ठेवणार नाही हे लक्षात ठेवा. तुमचे चोचले खूप पुरवले. झालं तेवढं खूप झालं. तुमचं काम सांगायचं असेल तर त्या माध्यमाचा उपयोग करा. जर उणीदुणी काढत असाल तर काढून तर बघा. कुणी जर काढलं असेल तर माझ्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, असा दमच राज ठाकरे यांनी यावेळी मनसेच्या पदाधिकारी आणि मनसैनिकांना दिला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या अनुशंगाने मनसे पदाधिकाऱ्यांना आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
राज ठाकरे यांनी यावेळी राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना काही मुद्दे देखील मांडले. ते म्हणाले की, ‘चांगल्या क्षेत्रातील महिलांनी पुरुषांनी राजकारणात आलं पाहिजे. मी याबाबत एक पत्रं काढणार आहे. राजकारण खूप विस्तारलेलं आहे. फक्त निवडणुका ही गोष्टच नाही. राजकारणाला तुम्ही तुच्छ मानता आणि त्यासाठीच दोन दोन तास रांगेत उभं राहून मतदान करता. मग तुच्छ कसं. आपल्याकडे कीड लागली आहे. जातीच्या, धर्माच्या नात्याच्या नावाने मतदान करत असतो. आपल्या राज्याने देशाला मार्गदर्शन केलं. यूपी बिहारसारखं राजकारण आपल्या राज्यात घुसत आहे. सर्वांना मत मागणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. आपल्याविरोधात प्रचार करतात. स्लो पॉईजन देत आहेत. ते तिथेच छाटा.’
पुढे बोलताना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सल्लाही दिला. ते म्हणाले की,’माझं भाषण मुलाखतीत मी जे बोलतो त्याचे मुद्दे काढा. त्याचा प्रचार करा. लोकांना ते सांगा. फक्त आंदोलन करून चालत नाही. तुम्ही प्रमुख पदावर आहात. त्या पदाची शान राखा.’
यावेळी राज ठाकरे यांनी राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात, असं म्हटलंय. ‘निवडणुका कधी होतील माहीत ननाही अग अग म्हशी हेच चालू आहे. निवडणुका कधीही लागतील. दिवाळीच्या आधी लागतील असं वाटत नाही. नोव्हेबंर डिसेंबर कदाचित जानेवारी आणि फेब्रुवारीतही लागतील. चिखल झालाय. कारण कोणी विचारणारा नाही. आता जिल्हा परिषदा पुढे ढकलल्या. महापालिका तीनचं की दोनचं. वॉर्डाला तीन माणसं चार माणसं. लोक काय गुलाम आहेत का. त्यांना नगरसेवकही माहीत नसतं. चार चार माणसांचा प्रभाग करताय. तो भाग कोणी बघायचा. कुणाला कळत नाही. कुठे जावं. कारण लोक जाब विचारत नाही. एकदा लोकांनी ठरवलं पाहिजे. खेळ मांडलाय नुसता. गृहित धरलंय लोकांना. तीनचा चारचा एकचा प्रभाग करा. लोकं येतील, जातील कुठे , त्यात पैसे वाटण्याची सुरुवात होते. आज नाही लक्षात येणार. काही वर्षानंतर लक्षात येईल. काय महाराष्ट्र होता आणि काय मातेरं केलं.’