मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray on Aarey Forest) मागाठाणे आणि दिंडोशी मतदारसंघातील आपल्या प्रचारसभेत सत्ताधारी भाजपसह शिवसेनेला जोरदार लक्ष्य केलं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता निवडणुकीत निवडून आलो, तर आरेला जंगल घोषित करण्याचं आश्वासन देतात. एका रात्रीत 2700 झाडं तोडली तेव्हा शांत होते. मग आता गवत लावून जंगल घोषित करणार का? असा सवाल राज ठाकरेंनी (Raj Thackeray on Aarey Forest) उद्धव ठाकरेंना केला.
राज ठाकरे म्हणाले, “सरकारने एका रात्रीतून आरेतील 2700 झाडं तोडली. मात्र, त्यानंतर आलेल्या शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेवर एक शब्दही नाही. उद्धव ठाकरे आता निवडणुकीत निवडून आलो, तर आरेला जंगल घोषित करण्याचं आश्वासन देतात. पण निवडून आल्यावर ते गवत लावून जंगल घोषित करणार आहे का?”
भाजप-शिवसेना “हीच ती वेळ” म्हणत आहेत, मग मागील 5 वर्ष हे काय करत होते? मागील 5 वर्ष हे फक्त हा घ्या आमचा राजीनामा म्हणत होते. यातच त्यांचे 5 वर्ष निघून गेले, असाही टोला राज ठाकरेंनी लगावला. बँका बुडत असताना सरकार आणि रिझर्व्ह बँक जबाबदारी घेत नाही. मग सर्वसामान्यांच्या पैशांची जबाबदारी कोणाची? पीएमसी बँकेच्या संचालकपदावर भाजपचे लोक आहेत. त्यांनी बँकेवर निर्बंध येण्याआधी एक दिवस नातेवाईकांना पैसे काढण्यास सांगितलं. सर्वसामान्यांचं काय?, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राज्यात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कलम 370 चा मुद्दा मांडतात. या मुद्द्याचा महाराष्ट्राशी काय संबंध? असाही सवाल राज ठाकरेंनी केला.
“लोक कामावर नाही, भावनेवर मतदान करतात”
राज ठाकरेंनी लोक लोक भावनेवर मतदान करत असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “नाशिकमध्ये काम करुनही लोकांनी मनसेकडील महापालिका भाजपकडे दिली. जर असं होणार असेल, तर लोकांची कामं कोण करेन? लोक काम पाहून कामावर मतं देत नाही, भावनेवर मतदान करतात. हेच सत्ताधाऱ्यांनी ओळखलं आहे.”
‘एकही आंदोलन अर्धवट सोडत नाही’
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात आंदोलन अर्धवट सोडण्याच्या आरोपावरही सडेतोड उत्तर दिलं. ते म्हणाले, “माझ्यावर आंदोलनं अर्धवट सोडण्याचा आरोप करतात. मात्र, मी एकही काम अर्धवट सोडत नाही. टोल आंदोलनानंतर 78 टोलनाके बंद झाले. मनसेने टोलनाके बंदचं, मराठी सणांना परवानगीचं, मराठी चित्रपटांना थिएटर मिळवण्याचं आंदोलन केलं आणि त्यात यशही मिळवलं.” महाराष्ट्रात अन्याय होतो, प्रश्न तयार होतो, तेव्हा जनता विश्वासाने मनसेकडं येते, असंही यावेळी राज ठाकरेंनी नमूद केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एक वीटही रचली नाही. केवळ समुद्रात फुलं टाकून आले. अशातच आता नवं खुळ काढून रायगडला 600 कोटी देण्याची घोषणा केली. असं करुन ते लोकांना केवळ घोषणांमध्ये अडकून ठेवत आहे. या घोषणा हा त्यांचा नवा तोडपाणीचा प्रकार आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारवर केला.
‘सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधीपक्ष हवा’
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मजबूत विरोधीपक्षाची पुन्हा एकदा आवश्यकता अधोरेखित केली. विरोधक नसतील तर सत्ताधाऱ्यांच्या लहरीप्रमाणे काम होईल. आरेला कारे करणारे हवेत. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मजबूत विरोधीपक्ष हवा, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला विजयी करण्याची ‘हिच ती वेळ’ आहे. सरकारच्या आरेला कारे करण्यासाठी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं.