दीड मिनिटांच्या भाषणात राज म्हणाले, “मी ग्रॅज्युएट नाही, मला आजपर्यंत कुणी डिग्रीबद्दल विचारलंही नाही”

| Updated on: Feb 04, 2020 | 11:54 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील इंक अलाईव्ह कार्यशाळेचे (Raj Thackeray ink alive Pune ) उदघाटन झाले. बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

दीड मिनिटांच्या भाषणात राज म्हणाले, मी ग्रॅज्युएट नाही, मला आजपर्यंत कुणी डिग्रीबद्दल विचारलंही नाही
Follow us on

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील इंक अलाईव्ह कार्यशाळेचे (Raj Thackeray ink alive Pune ) उदघाटन झाले. बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी याठिकाणी फार फार तर दीड मिनिटं बोलण्यासाठी आलो आहे. आज याठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे पालक असायला पाहिजे होते. मी केवळ आणि केवळ व्यंगचित्राचा कार्यक्रम असल्यामुळे मी पुण्यात आलो आहे. माझं दुसरं कोणतंही काम नाही”

“राज्य सरकार ज्यावेळेला चित्रकला हा विषय ऑप्शनला टाकतो त्यावेळी अशा संस्था उभं राहणं महत्त्वाचं असतं. प्रत्येकामध्ये एखादी कला असते. कोणतीही कला असेल ती वाढवणे आवश्यक आहे. जगात शिक्षणाला डिग्री लागते, कलेला लागत नाही. जगात कुठेही बिना डिग्रीचा प्रवास करता येतो”, असं राज ठाकरे म्हणाले.

“मी जे जे स्कूल ऑफ आर्टला होतो. तीन वर्षानंतर मी शिक्षण सोडून दिलं. त्यामुळे मी ग्रॅज्युएट नाही.  मला राजकीय व्यंगचित्रकार व्हायचं होतं, त्यामुळे मला माझे काका बाळासाहेब ठाकरे आणि वडील श्रीकांत ठाकरे यांच्याकडे मी व्यंगचित्रकला शिकलो. या क्षणापर्यंत मला कुणी विचारलं नाही की तुझ्याकडे डिग्री कोणती आहे. त्यामुळे कलेला डिग्री लागत नाही. तुमच्यामध्ये जी कोणती कला आहे, ती जोपासावी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कला हेरणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोणती कला दडली आहे हे हेरून त्याला दाखवली, तर आनंदाने ती कला तो आनंदाने पुढे घेऊन जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.

यावेळी राज ठाकरे यांनी कार्टूनिस्ट कंबाइनचे संजय मिस्त्री यांना मनसेत येण्याचे जाहीर निमंत्रण दिलं. राज ठाकरे म्हणाले, “संजय बरा बोलतो, येतो का पक्षात”

मुंबईत मनसेच्या मोर्चाची तयारी

दरम्यान, मनसेचा मुंबईत 9 फेब्रुवारीला मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात एल्गार पुकारलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चाची ‘मोर्चेबांधणी’ही चांगलीच सुरु केली आहे. मुंबईतील वर्सोवा भागात मनसेच्या वतीने बांगलादेशी घुसखोरांना इशारा देणारं पोस्टर (MNS Versova Poster) लावण्यात आलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार 9 फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता मनसेचा मोर्चा निघणार आहे. पोलिसांनी मनसेला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरुन मोर्चा नेण्यास परवानगी दिली आहे. याआधी मोर्चाचा मार्ग मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून (भायखळा) आझाद मैदानापर्यंत ठरवण्यात आला होता. मात्र मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने हा बदल केल्याचं सांगण्यात येत आहे.

मनेसेच्या मोर्चाला परवानगी देण्याच्या मुद्द्यावर स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. अनिल देशमुख म्हणाले होते, “राज ठाकरे यांनी मोर्चाला परवानगी मागितली आहे. त्यांना कोणत्या ठिकाणी परवानगी पाहिजे. यावर सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही निर्णय घेऊ. कायदा सुव्यवस्थेला कुठेही गालबोट लागायला नको, याचा सर्व विचार करुन त्यांना परवानगी देऊ.”

संबंधित बातम्या 

बांगलादेशी घुसखोरांनो तुमच्या देशात निघून जा, पोस्टरमधून ‘मनसे’ इशारा  

मनसेच्या 9 फेब्रुवारीच्या मोर्चाचा नवा मार्ग!