मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मनसेच्या मेळाव्याचं निमंत्रण मिळाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या मते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या भेटीत निमंत्रण दिल्याची माहिती आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर 6 एप्रिलला मनसेचा गुढीपाडव्यानिमित्त मेळावा आहे. मेळाव्यासाठी राज यांनी शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज ठाकरेंनी कालच्या भाषणातून मोदी-शाह या जोडीविरोधात आपण प्रचार करणार असल्याचं जाहीर केलंय. फायदा ज्याला व्हायचा त्याला होईल, पण आपण भाजपविरोधात प्रचार करणार असल्याचं ते म्हणाले. यासाठी त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेशही दिले आहेत. त्यानंतर त्यांची आता राष्ट्रवादीशी जवळीक वाढत आहे. हे निमंत्रण स्वीकारल्यास शरद पवार लवकरच मनसेच्या व्यासपीठावर दिसतील.
शरद पवार आणि राज ठाकरेंची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. कालच राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन, लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मोदी आणि शहा यांच्याविरोधात आपल्याला लढायचं आहे, अशी जाहीर भूमिका राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर, आज राज ठाकरे पुन्हा शरद पवारांच्या भेटीला गेले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचं लक्ष राज ठाकरे-शरद पवारांच्या भेटीकडे लागलं होतं. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यात राज ठाकरे यांनी भेट घेतली. तिथे शरद पवार यांच्याशी चर्चा केली.