औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुनही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) अल्टिमेटम दिलाय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची आज औरंगाबादेत (Aurangabad) जाहीर सभा होत आहे. या सभेला औरंगाबाद पोलिसांनी 15 हजाराची मर्यादा घालून दिलीय. मात्र, सभेला 1 लाखापेक्षा अधिक लोक उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. मराठवाड्यासह राज्यभरातून मनसे कार्यकर्ते औरंगाबादेत दाखल झाले आहेत. औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळतेय. इतकंच नाही तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार राज ठाकरेच आहेत, असे बॅनर सभास्थळावर पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी शिवसेना प्रवक्ते, आमदार, खासदारांची बैठक पार पडली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिद पाटील तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेंचं काय सुरु होतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. इतकंच नाही तर भोंगेवाले कोण आणि पुंगीवाले कोण याकडे मी लक्ष देत नाही, अशी खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी आज एका मुलाखतीत बोलताना लगावलाय.
दुसरीकडे राज ठाकरे हेच खरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार असल्याचे बॅनर राज ठाकरे यांच्या सभास्थळावर पाहायला मिळत आहे. हे बॅनर म्हणजे एकप्रकारे उद्धव ठाकरे यांना उत्तर असल्याचं मनसे कार्यकर्ते बोलत आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आले आहेत. मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी उचलून धरलेला हिंदुत्वाचा मुद्दा योग्यच असल्याचं मत हे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
नोटाबंदी, लॉकडाऊन देशभर केली तशी भोंगाबंदी देशभर करा, असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केली आणि भोंग्यांवरून राजकारण करणाऱ्यांना चपराक लगावली. भोंग्यांचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे. न्यायालयाने निकाल दिल्यानुसार भोंगे सुरू आहेत. त्यामुळे भोंग्यांचा विषय गौण असून विकास हा मुद्दा आमच्यासमोर महत्त्वाचा आहे, असं मुख्यमंत्री आज एका मुलाखतीत म्हणाले.