ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Letter) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. पत्रातून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची मागणी केली. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thacleray News) यांनी केली आहे. पत्र ट्वीट करुन राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती केलीय.
याआधीचा अनुभव पाहता, सरकार पंचनाम्याचे आदेश देतं. पण प्रशासकीय पातळीवर पंचनामे नीट होत नाही आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहते. त्यामुळे या परिस्थितीचा सरकारने युद्धपातळीवर आढावा घ्यावा आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांचीही दिवाळी धूमधडाक्यात करण्यासाठी सरकारने कटाक्षानं लक्ष द्यावं, अशी विनंती राज ठाकरे यांनी केलीय. तसंच प्रतिहेक्टरी जेवढी नुकसान भरपाई दिली जाते, ती पुरेशी नसल्याचंही उल्लेख त्यांनी यावेळी केलाय.
ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. @CMOMaharashtra pic.twitter.com/BsjqkGJWTY
— Raj Thackeray (@RajThackeray) October 20, 2022
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून राज ठाकरेंनी फडणवीसांना विनंती पत्र लिहिलं होतं, त्यानंतर आता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रानंतर भाजपने आपला उमेदवार अंधेरी पोटनिवडणुकीतून मागे घेतला होता. आता एकनाथ शिंदे राज ठाकरे यांनी केलेल्या विनंतीबाबत सकारात्मक निर्णय घेणार का, हे पाहणं महत्त्वाचंय.
राज्यात परतीचा पाऊस लांबला होता. त्यामुळे अनेक भागाला लांबलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घासही हिरावला गेल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रतही पावसामुळे शेतीला फटका बसलाय. यामुळे शेतकरी हवालदिल झालेत.
दरम्यान, आज मंत्रिमंडळाची बैठकही पार पडली. या बैठकीतही शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही देण्यात आलेत.
राज्यात गेल्या काही दिवसात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. pic.twitter.com/kJTvRnYvxG
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 19, 2022
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारने याआधीच घेतल्यांच मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे वेळेत होऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल, यासाठी आवश्यक बाबी आणि उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.