मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा झंझावात शुक्रवारपासून सुरु होतोय. नांदेडमधील पहिल्या सभेसाठी ते मुंबईहून देवगिरी एक्स्प्रेसने गुरुवारी रात्री नऊ वाजता रवाना झाले. मनसेचे त्यांचे सहकारीही त्यांच्यासोबत आहेत. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दहा ठिकाणी राज ठाकरे सभा घेणार आहेत. यातील पहिली सभा काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये आहे.
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता इतर सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. नांदेडचाही यामध्ये समावेश आहे. त्यापूर्वी राज ठाकरे सभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढणार आहेत. या निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात प्रचार करण्याचं जाहीर केलंय. माझ्या सभांचा फायदा आघाडीला होत असेल तर तो होऊ द्या, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
नांदेड शहरातील नवीन मुंडा मैदानावर उद्या म्हणजे शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता राज ठाकरेंची सभा होईल. यानंतर 15 तारखेला सोलापूर, 16 तारखेला कोल्हापूर, 17 तारखेला सातारा, 18 तारखेला पुणे आणि 19 तारखेला रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये राज ठाकरे यांची सभा होईल. या सर्व सभांची वेळ सायंकाळी साडे पाच वाजता ठेवण्यात आली आहे.
राज ठाकरेंचा दौरा