मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray meet Sharad Pawar) यांनी आज (2 नोव्हेंबर) अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. एकीकडे राज्यात सत्तास्थापनेवरुन पेच तयार झाला आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीने (Raj Thackeray meet Sharad Pawar) चर्चेला उधाण आलं आहे.
राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या “सिल्वर ओक” येथील घरी त्यांची भेट घेतली. ही भेट साधारण 10 मिनिटे चालली. मात्र, नेमके या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना, काही दिवसापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत हे सुद्धा शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. दिवाळीनिमित्त ती भेट झाल्याचं संजय राऊत म्हणाले असले, तरी सध्याच्या परिस्थितीत ही भेट चांगलीच चर्चेची ठरली आहे.
दरम्यान, याआधी राज ठाकरे यांचे कट्टर शिलेदार सरचिटणीस संदीप देशपांडे हे सुद्धा शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. पवारांच्या कामाने प्रभावित झाल्याने आपण भेट घेतल्याचं संदीप देशपांडे म्हणाले होते.
राज-शरद पवार भेटीगाठी
दरम्यान, राज ठाकरे आणि शरद पवार यांची ही काही पहिलीच भेट नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवारांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीतील रणनीती ठरल्याचं कळलं होतं. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर तुफान टीका केली होती. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला तर होऊ दे अशी थेट भूमिका घेतली होती.
याशिवाय लोकसभा निवडणुकीनंतरही म्हणजेच विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याच्या हालचाली राष्ट्रवादीकडून सुरु होत्या.
शरद पवार-राज जवळीक, मनसेसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग
राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीनंतर शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीच्या गोटात सामील होऊ शकते अशी चर्चा सुरु झाली. लोकसभा निवडणुकीदरम्यान मनसेला आघाडीत घेण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ यासारख्या बड्या नेत्यांनी केली. मात्र काँग्रेसने थेट विरोध केल्याने मनसेला प्रत्यक्ष आघाडीत सामील होता आलं नाही. तोच प्रयत्न विधानसभा निवडणुकीवेळीही झाली. मात्र त्यावेळीही तो प्रयत्न सफल झाला नाही.