मुंबई : मला ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणू नका, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मनसेच्या महाअधिवेशनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना ‘हिंदूहृदयसम्राट’ असं संबोधलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंनी हा पवित्रा घेतला (Raj Thackeray MNS Meeting) आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदराने ‘हिंदूहृदयसम्राट’ असं संबोधलं जातं. केवळ शिवसैनिकच नाही, तर सर्वपक्षीयांनी बाळासाहेबांना ही उपाधी बहाल केली आहे. मात्र मनसेने हिंदुत्ववादाकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यानंतर मनसेच्या महाअधिवेशनात ‘आजचे हिंदूहृदयसम्राट’ अशा शब्दात राज ठाकरेंचा गौरव उत्साही कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना या कडक सूचना कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यास सांगितलं आहे.
ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या पश्चात ‘शिवसेनाप्रमुख’ हे पद वापरण्याचं टाळत शिवसेना पक्षप्रमुख हे पद घेतलं होतं. त्याचप्रमाणे राज ठाकरेही ‘हिंदूहृदयसम्राट’ या पदाचा मान आणि आदर राखत ‘आजचे हिंदूहृदयसम्राट’ किंवा ‘नवे हिंदूहृदयसम्राट’ हे पद धारण करण्यास विनम्र नकार दर्शवला आहे.
मनसेचे कार्यकर्ते सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र वापरत आहेत. यावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये वादाची ठिणगी पडली होती. काही वर्षांपूर्वी खुद्द बाळासाहेबांनीच राज ठाकरेंना आपलं छायाचित्र न वापरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर राज ठाकरेंनी बाळासाहेबांचा फोटो वापरणं टाळलं होतं.
मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या रंगशारदा सभागृहात मनसेची बैठक आयोजित करण्यात आली होती. केवळ दहा मिनिटात चर्चा आटोपून राज ठाकरे बैठकस्थळाहून निघाले. मनसे नेत्यांना पुढील सूचना देण्यास राज ठाकरेंनी सांगितलं. ‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ मनसेने 9 फेब्रुवारीला आयोजित केलेला मोर्चा यशस्वी झाला पाहिजे, अशा सूचनाही राज यांनी दिल्या आहेत.
मनसेच्या बैठकीला बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील, अमेय खोपकर, अभिजीत पानसे यासारखे नेते उपस्थित होते. मनसेचे राज्यातील सरचिटणीस, उपाध्यक्ष, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख उपस्थित होते.
शिवसेनेत असतानाही राज ठाकरे यांची पाकिस्तानी आणि बांगलादेशी विरोधात हीच भूमिका होती. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकललंच पाहिजे, अशी राज ठाकरेंची भूमिका असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
मनसेच्या महाअधिवेशनानंतर पक्षात नवी उर्मी आलेली दिसत आहे. महाअधिवेशनातील समारोपाच्या भाषणात राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला जाहीर पाठिंबा दिला होता. मनसे 9 फेब्रुवारीला आझाद मैदानात ‘सीएए’च्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केली होती.
देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं राज ठाकरे म्हणाले (Raj Thackeray MNS Meeting) होते.