मुंबई : आपल्याला ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणू नका, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निक्षून सांगितलं आहे. त्यानंतर ‘हिंदूहृदयसम्राटांचा छावा’ अशी नवी उपाधी (Raj Thackeray MNS Poster) मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला दिली आहे.
‘हिंदूहृदयसम्राटांचा छावा’ असं लिहिलेलं पोस्टर घेऊन मनसेचा पालघरमधील कार्यकर्ता तुलसी जोशी मोर्चात सहभागी झाला आहे. याआधी ‘हिंदू जननायक’ असं पदही काही कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे बहाल केलं होतं. पुणे, नाशिकसह राज्यभरातील मनसैनिक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत आले आहेत.
मनसेच्या महाअधिवेशनात कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना ‘हिंदूहृदयसम्राट‘ असं संबोधलं होतं. अभिनेते आणि मनसे पदाधिकारी संजय नार्वेकर यांनीही राज ठाकरेंचा उल्लेख कलाकारांना जाणणारा ‘जाणता राजा’ असा केला होता. त्यानंतर लगेचच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी तशी उपाधी न देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदराने ‘हिंदूहृदयसम्राट’ असं संबोधलं जातं. केवळ शिवसैनिकच नाही, तर सर्वपक्षीयांनी बाळासाहेबांना ही उपाधी बहाल केली आहे. मात्र मनसेने हिंदुत्ववादाकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यानंतर मनसेच्या महाअधिवेशनात ‘आजचे हिंदूहृदयसम्राट’ अशा शब्दात राज ठाकरेंचा गौरव उत्साही कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना या कडक सूचना कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यास सांगितलं.
ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या पश्चात ‘शिवसेनाप्रमुख’ हे पद वापरण्याचं टाळत शिवसेना पक्षप्रमुख हे पद घेतलं होतं. त्याचप्रमाणे राज ठाकरेही ‘हिंदूहृदयसम्राट’ या पदाचा मान आणि आदर राखत ‘आजचे हिंदूहृदयसम्राट’ किंवा ‘नवे हिंदूहृदयसम्राट’ हे पद धारण करण्यास विनम्र नकार दर्शवला आहे.
‘महाराष्ट्राची राजधानी घुसखोर पोखरत आहेत’ ह्या वास्तवाचं भान वेळीच आलं तर आणि तरंच हे शहर वाचू शकेल! #मनसे_महामोर्चा pic.twitter.com/0GwjGdVQ2W
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 7, 2020
मनसेचा महामोर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात दुपारी बारा वाजता गिरगाव चौपाटीजवळील हिंदू जिमखान्यापासून मनसेच्या मोर्चाला सुरुवात होईल. आझाद मैदानावर पोहचल्यानंतर राज ठाकरे जाहीर सभेला संबोधित करतील.
गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना येथून मनसेच्या मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे मोर्चात सहभागी होतील. सर्व कार्यकर्ते, मोर्चात सहभागी संघटना आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील.
शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. मोर्चा मेट्रो सिनेमा भागात पोहचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात आत जातील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटनी आझाद मैदानात आत जातील.
मुंबईतील आझाद मैदानात सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य स्टेज उभारण्यात आला असून दोन लाख जणांसाठी आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे.
आझाद मैदानात उभारलेल्या भव्य स्टेजवर आधी मनसे नेत्यांची भाषणं होतील. अखेरीस राज ठाकरे यांचं भाषण होईल. हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे राज ठाकरे आपल्या भाषणातून सांगतील. त्यानंतर मोर्चाची सांगता होईल.
Raj Thackeray MNS Poster