पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभांचा धडका लावला आहे. मुंबईतील दोन सभा आणि औरंगाबादेतील एका सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच राज ठाकरे यांचे टार्गेट राहिले. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतल्यानं महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आणि पर्यायानं शिवसेनेची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. आता राज ठाकरे यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. पुण्यात राज ठाकरे यांची सभा 22 मे (रविवारी) रोजी सकाळी 10 वाजता होणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलंय.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं चांगलाच जोर लावला आहे. त्यात रुपाली पाटील यांच्या रुपानं मनसेला मोठा झटका बसला. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला काहीसा विरोध केल्यानं वसंत मोरेही पक्षात एकाकी पडल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला विशेष महत्व प्राप्त झालंय. राज ठाकरे यांच्या सभेमुळे मनसेचं स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा भरली जाईल, अशी आशा मनसे कार्यकर्त्यांना आहे.
दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मुंबई आणि औरंगाबादेतील सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच टार्गेट राहिले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. तर शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केल्याचा आरोप राज यांनी केला आहे. तर राज यांनी भाजप नेत्यांवर टीका करणं टाळल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पुण्यातील सभेत राज ठाकरे कोणते मुद्दे मांडणार आणि त्यांच्या टार्गेटवर कोण असणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये वसंत मोरेंचे नाराजी नाट्य सुरु आहे. याबाबत राज ठाकरेंना भेटायचे आहे. त्यांच्याशी भेट झाली की नाराजी दूर होईल, असेही त्यांनी सांगितले. गेल्या वेळी राज ठाकरे जेव्हा पुण्यात आले होते, तेव्हा त्यांच्याशी भेट होऊ शकली नव्हती. या वेळेस मला वेळ दिला होता, मात्र अचानक तब्येत बिघडल्यानं राजसाहेब मुंबईला गेले. पुढच्या वेळेस नक्की वेळ देतील. मात्र, पुण्यातील सभा आमच्यासाठी निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची आहे. मी माझ्या पद्धतीने तयारी करणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिलीय.