मुंबई : इंग्लंड आणि अमेरिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात ‘शॅडो कॅबिनेट’ची संकल्पना राबवण्याची चिन्हं (Raj Thackeray MNS Shadow Cabinet) आहेत. राज्य सरकारमधील प्रत्येक मंत्र्यावर नजर ठेवण्यासाठी मनसेतून एक-एका नेत्याची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे.
मनसेच्या महाअधिवेशनात दुपारच्या सत्रात शॅडो कॅबिनेटची घोषणा होण्याची शक्यता आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई शॅडो कॅबिनेटची घोषणा करणार आहेत. मनसे नेते शिरीष सावंत यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला यासंदर्भात माहिती दिली.
राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी पक्षातील प्रत्येक नेता आणि सरचिटणीस यांना संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा मनसे नेते पाठपुरावा करतील. हे सर्व नेते पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना मंत्र्याचं रिपोर्ट कार्ड देतील.
संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अविनाश अभ्यंकर, शालिनी ठाकरे, जयप्रकाश बाविस्कर, संतोष धुरी, यशवंत किल्लेदार, अनिल शिदोरे यासारख्या बड्या नेत्यांचा शॅडो कॅबिनेटमध्ये समावेश असेल. मनसेच्या कोणत्या नेत्याकडे कोणत्या मंत्र्याची जबाबदारी असेल, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
शॅडो कॅबिनेट म्हणजे नेमकं काय?
सरकारमध्ये विरोधी पक्षाला अतिशय महत्त्व असते. पर्यायी पक्ष म्हणून तोच अधिकारावर येण्याची शक्यता असते. विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला ‘शॅडो कॅबिनेट’ म्हणतात. अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीत कॅबिनेट पद्धतीला सुरुवात झाली.
कॅबिनेटमध्ये प्रथम श्रेणीचे 15 ते 20 मंत्री असतात. राज्यमंत्री, उपमंत्री यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसतो. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मात्र 33 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे मनसेच्या प्रत्येक नेत्याकडे दोन-दोन मंत्र्यांची जबाबदारी दिली जाण्याची चिन्हं आहेत.
मनसेचा नवा झेंडा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले आहेत.
मनसे आणि भाजप समविचारी, मनसेच्या झेंड्याच्या अनावरणानंतर गिरीश महाजनांकडून युतीचे संकेत
मनसेच्या महाअधिवेशनासाठी गोरेगावातील नेस्को ग्राऊण्डवर राज ठाकरे हे मातोश्री कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि कन्या उर्वशी ठाकरे यांच्यासह सकाळी नऊ वाजताच दाखल झाले. त्यानंतर सव्वादहा वाजताच्या सुमारास मनसेच्या झेंड्याचं राज ठाकरेंनी अनावरण केलं. त्यानंतर पारंपरिक गोंधळ नृत्य सादर करत अधिवेशनाला सुरुवात झाली.
मनसेने तीन रंगाचा जुना झेंडा बदलून भगव्या रंगाचा ध्वज धारण केला आहे. यातून मनसे हिंदुत्ववादी विचारांची कास धरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सुलेखनकार अच्युत पालव यांनी मनसेच्या झेंड्याचं डिझाईन केल्याचं बोललं जात आहे. संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांनी राजमुद्रा वापरण्यास केलेला विरोध झुगारुन मनसेने नवा झेंडा घेतला आहे.
Raj Thackeray MNS Shadow Cabinet