Raj Thackeray मुंबई : कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) सकाळी साडेदहा वाजता कृष्णकुंज या निवासस्थानावरुन ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. त्या आधी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केली.
राज ठाकरे सकाळी साडेदहा वाजता ‘कृष्णकुंजवरून’ बाहेर पडले. त्यांचा 9 नंबरचा आकडा लकी बोलला जातो. राज ठाकरे लँड क्रूझर या त्यांच्या नऊ नंबरची गाडीत ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसले. त्यांच्या मागे इनोव्हा गाडी होती, ती सुद्धा नऊ नंबरची. त्यामध्ये राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते. तर त्याच गाडीत मागे अमित ठाकरे यांची पत्नी मिताली आणि आई शर्मिला ठाकरे बसल्या होत्या. राज ठाकरेंना सोडण्यासाठी त्यांच्या मातोश्री दरवाजापर्यंत आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते.
राज ठाकरे सकाळी 10.30 वाजता घरातून ईडी कार्यालयाकडे निघाले. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी, मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली उपस्थित होते. राज ठाकरे गाडीपर्यंत गेले त्यावेळी त्यांच्या आईने त्यांचा हात पकडला होता. त्यावेळी आईच्या डोळ्यात अश्रू होते.
राज ठाकरे दादरवरुन सिद्धिविनायक मंदीर, प्रभादेवी, सासमिरा, वरळी, हाजी अली या मार्गे ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. या मार्गावर पोलिसांचं अक्षरश: कडे होते. ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांची छावणी आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिली होती. मात्र राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांतता राखा, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस टाळा, सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या, ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका, असं आवाहन केल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला.
मनसे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे हे राज ठाकरेंचं निवासस्थान कृष्णकुंजवर थांबून आहेत.
#Mumbai: Maharashtra Navnirman Sena (MNS) Chief Raj Thackeray has been summoned by the Enforcement Directorate to appear before the agency, today. pic.twitter.com/Q7taHe21ZJ
— ANI (@ANI) August 22, 2019
कोहिनूर स्क्वेअर टॉवर
कोहिनूर सीटीएनलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपचं कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. ही कंपनी मुंबईत कोहिनूर स्क्वेअर टॉवर्स उभारत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांनी ही कंपनी सुरु केली होती. कोहिनूर मिल क्रमांक 3 विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका होती, यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते.
गेली तीन दिवस उन्मेष जोशी यांची ईडीने चौकशी केली. तर राजन शिरोडकर यांनाही ईडीने दोन दिवस चौकशीसाठी बोलावलं होतं. आज या दोघांची चौकशी नाही. आज केवळ राज ठाकरे यांचीच चौकशी होत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
कोहिनूर सीटीएनएल (Kohinoor CTNL) ही उन्मेष जोशी (Unmesh Joshi) यांच्या मालकीची कंपनी आहे. उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर हे 2008 पर्यंत ‘कोहिनूर CTNL’ कंपनीचे शेअर होल्डर (भागीदार) होते. त्यांनी कोहिनूर मिल नंबर 3 ही जागा 2003 मध्ये लिलाव पद्धतीने 421 कोटींना खरेदी केली होती.
या जमिनीवर ‘कोहिनूर स्क्वेअर’ ही बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. या कंपनीत सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएल अँड एफएस – IL&FS) 225 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
मात्र 2008 मध्ये IL&FS ने मोठं नुकसान सहन करत आपले 225 कोटी रुपयांचे सर्व शेअर्स केवळ 90 कोटींना कोहिनूर CTNL ला देऊन टाकले. त्याचवेळी राज ठाकरेंनीही आपले सर्व शेअर कंपनीला विकले आणि ते कंपनीतून बाहेर पडले.
आपले शेअर्स दिल्यानंतरही IL&FS या सरकारी कंपनीने उन्मेष जोशींच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला अडव्हान्स लोन अर्थात आगाऊ कर्ज दिलं. ते कर्जही कोहिनूर सीटीएनएल कंपनी भागवू शकली नाही.
वर्ष 2011 मध्ये कोहिनूर सीटीएनएलने आपली काही मालमत्ता विकून 500 कोटी रुपयांचं कर्ज भागवण्यासाठी IL&FS सोबतच्या करारावर सह्या केल्या. या करारानंतरही IL&FS या कंपनीने पुन्हा कोहिनूर सीटीएनएल कंपनीला आणखी 135 कोटी रुपयांचं कर्ज दिलं.