औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नव्या झेंड्याचं अनावरण केल्यानंतर आणि मुंबईतला मोर्चा यशस्वी पार पाडल्यानंतर राज ठाकरे हे आता औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत (Raj Thackeray on Aurangabad Tour). औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असलेला राज ठाकरे यांचा दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. या दौऱ्यातून राज ठाकरे यांच्या वाटचालीची खरी दिशा ठरणार आहे.
मुंबईत उसळलेलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे भगवं वादळ उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. आता हेच भगवं वादळ मुंबईच्या सीमा पार करुन महाराष्ट्रात फोफाऊ पाहत आहे. हेच भगवं निशाण घेऊन राज ठाकरे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं शहर असलेल्या औरंगाबाद शहरात गुरुवारपासून (13 फेब्रुवारी) दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरे यांनी घेतलेल्या नव्या भगव्या भूमिकेची चाचपणी राज ठाकरे औरंगाबाद शहरातून करण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे मनसेच्या माध्यमातून आपलं नशीब आजमावत आहेत. सुरुवातीला परप्रांतीयांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी रान पेटवलं आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी शड्डू ठोकला. या मुद्द्यावरून राज ठाकरे यांना काही काळ यश मिळालं. पण कालांतराने राज ठाकरे यांचा तो मुद्दा माघे पडला. दरम्यान मागील काही काळ राज ठाकरे यांची राजकीय कारकीर्दही मुद्दाहीन होती. मात्र, आता राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यामुळेच राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येण्यापूर्वीच त्यांच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद की संभाजीनगर या वादात उडी घेतली आहे.
औरंगाबाद शहरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी केली आहे. गुरुवारी राज ठाकरे शहरात आल्यानंतर शहराचं प्रवेशद्वार असलेल्या बाबा पेट्रोल पंप चौकात राज ठाकरे यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर शहरात आणखी काही ठिकाणी राज ठाकरे यांचं स्वागत होणार आहे. त्यानंतर 2 दिवस राज ठाकरे शहरात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन निवडणुकीचा कानमंत्र देणार आहेत.
शिवसेनेने आपला हिंदुत्वाचा मुद्दा सोडला आहे, असं गृहीत धरून मनसे नेमकं तोच मुद्दा हायजॅक करत असल्याचं सध्या दिसतंय. मात्र, हिंदुत्वाच्या जीवावर ज्या शिवसेनेने औरंगाबाद शहराला आपला गड बनवलं, ती शिवसेना मनसेच्या या भूमिकेचा कडवा विरोध करताना दिसत आहे.
सध्या औरंगाबाद शहरात शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत सर्वाधिक 29 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. 9 पैकी 6 आमदार शिवसेनेचे आहेत. महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरही शिवसेनेचीच सत्ता आहे. दुसरीकडे आज घडीला औरंगाबाद शहरात मनसेचा एकही लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे सेना मनसेची ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशीच होणार आहे.
औरंगाबादच्या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे तब्बल 3 दिवस शहरात तळ ठोकणार आहेत. या कालावधीत काही ठिकाणांना ते भेटी देणार आहेत, तर काही व्यक्तींच्या भेटीही घेणार आहेत. त्याच बरोबर कार्यकर्त्यांच्या फळीला विश्वास देण्याचं काम राज ठाकरे करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा किती यशस्वी ठरतो हे महापालिका निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.
संबंधित व्हिडीओ :