मुंबई : ‘मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो’, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजप-मनसेच्या चर्चांवर भाष्य केलं. मनसेने पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलल्याने मनसे भाजपशी युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे (Raj Thackeray). मात्र, मी रंग बदलून सरकारमध्ये जात नाही, असं राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशनात स्पष्ट केलं. जसं शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. तशी मनसे सत्तेसोठी भाजपशी युती करणार नाही, असा टोला अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. मनसेच्या महाअधिवेशनाची सांगता आज (23 जानेवारी) राज ठाकरे यांच्या भाषणाने झाली. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे मांडले. राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वावरही भाष्य केलं. तसेच, राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्या थेट पाठिंबा असल्याचंही स्पष्ट केलं आहे (BJP-MNS Alliance Rumors).
“मी एक गोष्ट आजच सांगून ठेवतो. मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. हे मी आज बोलत नाही. माझे 14 वर्षांतील भाषणं काढून पाहा. माझ्या मराठीला नख लावलं तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल आणि माझ्या धर्माला नख लावलं तर हिंदू म्हणून अंगावर जाईल. येथे सकाळी जरी गोंधळ झाला असला, तरी मी स्पष्ट आहे. मी मागील काही दिवसांपासून वाचतो आहे. जे देशाशी प्रामाणिक आहेत, ते मुस्लीम आमचेच आहे. आम्ही एपीजे अब्दुल कलाम, जहीर खान, जावेद अख्तर यांच्यासारख्या लोकांना विसरु शकत नाही. ते आमचेच आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.
“जावेद अख्तर यांची मुलाखत पाहिली त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली. उर्दू भाषा ही कधीच मुस्लीमांची भाषा नव्हती. म्हणूनच बांग्लादेशाने बंगाली भाषेच्या मुद्यावर वेगळा देशा मागितला. भाषा कोणत्याही धर्माची नसते. हे मला सरसकट मान्य नाही. आझाद मैदानावर रझा अकादमीच्या लोकांनी पोलीस भगिणींवर हात टाकला तेव्हा या राज ठाकरे आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. भारतात कलाकार राहिले नव्हते असं समजत पाकिस्तानी कलाकारांना भारतात आणलं, तेव्हा त्यांना हाकलणारे मनसेचे कार्यकर्ते होते. तेव्हा कुणी नाही म्हणालं की हिंदूत्वाकडे जात आहात.”
“धर्म प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावेत. त्यासाठी मशिदींवर लागलेले भोंगे काढावेत. आमची आरती त्रास देत नाही, नमाज का त्रास देतोय? नमाज का पढता, असं आम्ही म्हणत नाही. भोंग लावून का नमाज करतात? किती बांग्लादेशी भारतात आले याचा काहीच अंदाज नाही. हे बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लमांना हाकलून लावा असं अनेक वर्षांपासून सांगतो आहे. तेव्हा कुणी नाही म्हणालं, हिंदुत्वाकडे जात आहात?”
“आम्हाला आमचा मार्ग माहिती आहे. भारत काय धर्मशाळा नाही. कुणीही येथे यावं आणि येथे राहावं. अडीच हजार रुपये दिले तर भारतात येता येतं. पाकिस्तानचे नेपाळमार्गे येत आहेत. माझं केंद्र सरकारला सांगणं आहे. तुम्ही पहिल्यांदा समझोता एक्स्प्रेस बंद करा.”
“आपल्याला यांच्याशी संबंध का ठेवायचे आहेत. माझ्या अनेक क्लिप्स लोकं काढतात आणि फिरवतात. मी तेव्हा सांगितलं होतं की उद्या जर युद्ध झालं तर आपल्या सैन्याला बाहेर लढण्याची गरज राहणार नाही, आतच लढावं लागेल. मला लोक विचारतात तुम्ही मोदींवर टीका केली. मी माणूसघाणा नाही. जिथं चूक वाटलं तिथं टीका केली. जिथं चांगलं वाटलं तिथं कौतुक केलं. काश्मीर, राम मंदिर विषयावर मी कौतुक केलं. मात्र, आज ज्या गोष्टी होत आहेत. जे बाहेरुन आले आहेत त्यांना का पोसायचं? या लोकांची आपल्या पोलिसांकडे आहे. माझा मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर इतका विश्वास आहे, की त्यांना एकदा 48 तासांचा वेळ द्या बघा ते काय करुन ठेवतात.”
“अचानक देशात मोर्चे निघायला लागले, मुस्लीम रस्त्यावर उतरले. मला काहींनी सांगितलं की त्यांना काश्मीर, राम मंदिराचा राग आहे. त्याचा एकत्रित राग आत्ता बाहेर येत आहे. ते जर बाहेरच्या मुस्लिमांसोबत उभे राहत असतील तर आम्ही त्यांना का साथ द्यावी.”
“अनेक जण म्हणतात, राज ठाकरेचा रंग बदलला का? मात्र माझा रंग तोच आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो. राज ठाकरे विरोधाला विरोध करत नाही. जे योग्य त्याचं अभिनंदन, जे चुकीचं आहे त्यावर बोलणारच.”
“देशाच्या इतर भागातून सरळ लोक देशात घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लीम बाहेर काढले पाहिजे. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे”, असं म्हणत राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या CAA कायद्याला समर्थन दर्शवलं.
पाहा राज ठाकरेंचं मनसेच्या महाअधिवेशनातील संपूर्ण भाषण