पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला. यावेळी त्यांनी मशिदीवरील (Mosque) भोंग्याला तीव्र विरोध दर्शवलाय. राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे हटवावे लागतील. अन्यथा मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिलेत. राज यांच्या या मुस्लिम विरोधी भूमिकेमुळं मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय. इतकंच नाही तर पुण्यात एक राजीनामाही पडलाय. डॅशिंग नगरसेवक अशी ओळख असलेले मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय. अशावेळी पक्षातील नाराजी कमी करण्यासाठी वसंत मोरे यांना खुद्द राज ठाकरेंनीच बोलावणं पाठवलं आहे.
राज यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या आदेशाबाबत नाराज असलेले मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरेंना भेटीसाठी शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी बोलावलं आहे. वसंत मोरे हे शुक्रवारी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. त्यावेळी राज ठाकरे वसंत मोरे यांची नाराजी कशाप्रकारे दूर करतात आणि वसंत मोरे आपल्या मतदारसंघातील मुस्लिम मतांचं गणित साधण्यासाठी काय करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मशिदीवरच्या भोंग्याविरोधात राज ठाकरेंनी शिवतीर्थावरुन एल्गार तर केला. मात्र त्याच एल्गाराचे साईड इफेक्ट पक्षात उमटू लागले आहेत. पुण्यातल्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ केले आहेत. विकासाच्या ब्लु प्रिंटवरुन थेट भोंगे हटवण्यापर्यंत भूमिका का बदलली, असे प्रश्न मनसेचे काही पदाधिकारी विचारत आहेत. वसंत मोरेंनी तर थेट त्यांच्या प्रभागात लाऊड स्पीकर न लावण्याचं सांगून अप्रत्यक्षपणे पक्षाचा आदेश झुगारुन लावलाय.
मनसेच्या भूमिकेमुळे वसंत मोरेंची अडचण नेमकी काय आहे, ती सुद्दा समजून घेणे गरजेचे आहे. कात्रजमधून वसंत मोरे गेल्या 10 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. वसंत मोरे जातीनं मराठा आहेत. मात्र त्यांच्या प्रभागातला मुस्लिम मतदार मनसेऐवजी वसंत मोरेंच्या कामामुळे त्यांच्या पाठिशी राहिला आहे. कात्रज प्रभागात मुस्लिमांची 3 हजार 800 मतं आहेत आणि हीच मतं गेमचेंजर ठरतात.
इतर बातम्या :