मुंबई : अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचंय. असा शब्द अमित शाह यांनी दिला होता. पण भाजपने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आम्ही युती तोडली, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार म्हणतात. त्याच मुद्द्यावर भाजपसोबत फारकत घेत त्यांनी काडीमोड केला. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात त्यांनी सरकार स्थापन केलं. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय बोलणं झालं हे आम्हाला माहित नाही. ती बंद दारा आडची चर्चा होती, असं देवेंद्र फडवणवीस (Devendra Fadnavis) म्हणतात. या सगळ्या दाव्या प्रतिदाव्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केलं. “शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मागायची काहीच गरज नव्हती, त्यावर फक्त भाजपचा अधिकार होता”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
“2019 ला निवडणुका झाल्या भाजपसेना एकत्र लढले. त्यानंतर फारकत घेतली. अडीच वर्षाच्या मुद्द्यावर. मला अजूनही आठवतं. मला माहीत आहे. मी त्या बैठकीला असायचो. सेंटार हॉटेल किंवा घरी बैठका व्हायच्या. बाळासाहेब, मनोहर जोशी वहाडणे, मुंडे महाज यांच्यात एक गोष्ट ठरली. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. ही गोष्ट तुमच्यात ठरली आहे. तर 2019 ला तुम्ही मागणी करूच कशी शकता. कमी आमदार आल्यावर. म्हणे कमिटमेंट केली. चार भिंतीत कमिटमेंट घेतली. माणसे दोनच. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे ठरलेलंच आहे तर तुम्ही मुख्यमंत्रीपद मागताच कसं?”, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
“पंतप्रधान मोदी जेव्हा भाषण करायचे. त्या मंचावर उद्धव ठाकरे बसलेले. मोदी जाहीर भाषणात सांगतात. सत्ता येईल आणि देवेद्र फडणवीस होईल. शहा भाषणात सांगतात. फडणवीस मुख्यमंत्री होईल. तेव्हाच आक्षेप का घेतला नाही. त्यावेळीच त्यांना फोन का केला नाही. सर्व निकाल लागल्यावर तुम्हाला आठवलं. याचं कारण या सर्व गोष्टींची बोलणी आधी पासून सुरु असणार. लोकांनी मतदान कुणाला केलं होतं. दोन्हीकडच्या मतदारांना काय वाटलं असेल. सेना भाजप नको म्हमून मतदान केलं तुम्ही त्यांच्यासोबत गेला. भाजप सेनेच्या मतदारांना वाटत असेल दोन्ही काँग्रेस नको म्हणून तुम्हाला मतदान केलं. ते नकोत म्हणून मतदान केलं आणि तुम्ही त्यांच्यासोबत जाता. ही हिंमत होते कशी. जेव्हा लोकं शासन करत नाही. शिक्षा करत नाही. तेव्हाच ही हिंमत होते. आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. तुम्ही आमच्या मतांची किमत केली नाही”,असंही राज ठाकरे म्हणालेत.
मुंबईतील प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला. तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांआधी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज ते आज पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात बोलले.