नाशिक: राज ठाकरे यांच्या मनसेने जुन्या गोष्टी विसरुन आता नव्याने उभारी घ्यायची ठरवले असले तरी पक्षाचा एकेकाळचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची बाब समोर आली आहे. याठिकाणी मनसेतील (MNS) अंतर्गत गटबाजीतून एका नेत्याची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. या माध्यमातून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांना इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Internal politics in Nashik MNS)
मनसेच्या मध्य विधानसभा निरीक्षक पदावरून सचिन भोसले यांना नुकतेच दूर करण्यात आले. अंतर्गत गटबाजीचे राजकारण करत असल्यामुळे मनसेने भोसले यांना पदावरुन दूर केल्याचे समजते. सचिन भोसले हे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे सचिन भोसले यांची गच्छंती ही अप्रत्यक्षपणे मुर्तडक यांना इशारा असल्याचे मानले जात आहे.दरम्यान, सचिन भोसले यांनी तुर्तास सबुरीचे धोरण स्वीकारले आहे. आगामी काळात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन, असे सचिन भोसले यांनी सांगितले.
नाशिक महागनरपालिकेतील स्थायी समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसे एकत्र आले होते. त्यामुळे भाजपचे गणेश गीते स्थायी समितीच्या सभापतीपदी निवडून आले होते. या निवडणुकीत मनसे किंगमेकर ठरला होता. भाजप आणि महाविकास आघाडी दोघांचेही प्रत्येकी 8 सदस्य असल्यामुळे नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीची रंगत वाढली होती. मात्र, मनसेने ठरल्याप्रमाणे भाजपला साथ दिल्याने पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या भाजपच्याच ताब्यात राहण्यास मदत झाली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जातोय. पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी, बैठका आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीविषयी रणनिती राज ठाकरे आखतील.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 15 व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना एक ऑडिओ संदेश पाठवला होता. यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले होते. अनेक पराभव पचवूनही गेली १५ वर्षे साथ देणाऱ्या मनसैनिकांचे राज ठाकरे यांनी आभार मानले. ‘मी तुम्हाला कधीही विसरणार नाही,’ असा शब्दही राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
काही जण सोडून गेले, जाऊ द्यात. पण माझ्यासोबत सह्याद्रीच्या कड्यासारखे टिकून आहेत, त्यांना मी कधीही विसरणार नाही. पक्षाला जे जे यश मिळेल, त्याचे वाटेकरी तुम्हीच असाल. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र तुमच्याच हातून घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या:
राज ठाकरेंचं मिशन महानगरपालिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी, बैठका आणि बरंच काही!
पुण्यातील नव्या शिलेदारांना मिळणार राज ठाकरेंचा कानमंत्र
(Internal politics in Nashik MNS)