मनसे महाअधिवेशन, शिवसेना भवनासमोर राज ठाकरेंचं भगवं पोस्टर

| Updated on: Jan 17, 2020 | 8:52 AM

मराठी आणि हिंदुत्व यांची सांगड घालणाऱ्या 'महाराष्ट्र धर्मा'वर मनसे पुढची वाटचाल करणार का? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

मनसे महाअधिवेशन, शिवसेना भवनासमोर राज ठाकरेंचं भगवं पोस्टर
Follow us on

मुंबई : अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या पहिल्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच कंबर कसली आहे. मुंबईत दादरमधील शिवसेना भवनासमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो असलेलं भगवं पोस्टर (Raj Thackeray Saffron Poster) लावण्यात आलं आहे.

‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असं या पोस्टरवर लिहिलं आहे. सेनाभवनासमोर गुरुवारी रात्री हे भव्य पोस्टर लावण्यात आलं. त्यानंतर, मराठी आणि हिंदुत्व यांची सांगड घालणाऱ्या ‘महाराष्ट्र धर्मा’वर मनसे पुढची वाटचाल करणार का? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेला डिवचण्यासाठीच मनसेने हे पोस्टर शिवसेना भवनासमोर लावल्याचीही चर्चा होत आहे.

दुसरीकडे राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली गुप्त भेट उजेडात आल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आलं. दोन्ही पक्षांनी युतीच्या शक्यता फेटाळलेल्या नाहीत, त्यामुळे महाअधिवेशनात कोणत्या समीकरणांची नांदी होणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं अधिवेशनात अधिकृत लाँचिंग होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच त्यांच्यावर पक्षातील मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मनसेने 23 जानेवारी ही तारीख निवडली आहे. त्यासोबतच पक्षाच्या झेंड्यातही बदल करत मनसे हिंदुत्वाचे राजकारण करणार असल्याची चर्चा सुरु (Raj Thackeray Saffron Poster) आहे.