मुंबई : भाजपच्या ‘डिजीटल गाव हरिसाल’च्या पोलखोलनंतर ‘मोदी है तो मुमकिन है’च्या जाहिरातीवरील कुटुंबाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंचावर आणलं. भाजपने खोटा प्रचार करत सोशल मीडियावरुन या कुटुंबाचा फोटो चोरला आणि जाहिरातीसाठी वापरला, असा आरोप राज ठाकरेंनी केला. मुंबईच्या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदी-शहांवर निशाणा साधला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभांच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यातील पहिली सभा मुंबईतील अभ्युद्यनगर काळाचौकी येथे आज पार पडली. नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड या ठिकाणच्या जाहीर प्रचारसभेनंतर राज ठाकरे यांनी मुंबईतल्या सभेतही मोदी-शहांवर टीकास्त्र सोडलं.
भाजपच्या योजनेतील आणखी एक कुटुंब राज ठाकरेंच्या मंचावर
‘मोदी है तो मुमकिन है’ म्हणत ‘मोदी फॉर न्यू इंडिया’च्या फेसबुक पेजवर भाजपाकडून एका कुटुंबाचा फोटो वापरत खोटी जाहिरात करण्यात आली, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. भाजपकडून एका कुटुंबाचा फोटो जाहिरातीसाठी वापरण्यात आला होता. या योजनेतील जाहिरातीसाठी भाजपने वापरलेल्या फोटोतील कुटुंबाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंचावर आणलं आणि पुन्हा एकदा भाजपची पोलखोल केली. अशा अजून किती कुटुंबियांच्या फोटोचा वापर करत भाजप प्रचार करणार? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला.
1947 पासूनचा सर्वात मोठा घोटाळा म्हणजे नोटाबंदी : राज ठाकरे
भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर देशभरात केलेली नोटाबंदी हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात जो बोलेल, त्यांच्याविरोधात ईडीच्या केसेस टाकल्या जातात. मात्र, मोदी आणि शहांनी विसरु नये की, तुम्हीही कधी ना कधी विरोधी पक्षात असाल, त्यावेळी तुमच्यावरही ईडीच्या केसेस पडतील, असे म्हणत राज ठाकरेंनी मोदी-शहांवर निशाणा साधला.
देशात मोदी सरकार पुन्हा येणार नाही
मुकेश अंबानी आणि उदय कोटक या दोन बड्या उद्योगपतींनी दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावरुन देशात भाजप किंवा मोदी सरकार येणार नाही हे निश्चित आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तुलना 2014 च्या लोकसभा निवडणुकांशी केली, तर भाजपला 165 जागा मिळायला हव्या होत्या. पण त्यांना फक्त 99 जागा मिळाल्या. यावरून मोदींच्या गुजरातमध्येच अशी परिस्थिती असेल, तर वारं कधीपासून बदलू लागलंय हे तुम्ही समजू शकता, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
अटलजींनी मोदींसारखा युद्धाचा बाजार मांडला नाही
नरेंद्र मोदींकडे दाखवण्यासारखे काहीच उरले नाही, त्यामुळेच ते आता पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांच्या नावावर मतं मागत आहेत, असाही आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच, इम्रान खान यांच्या पंतप्रधान कोण असावा याविषयीच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. ‘पाकिस्तानचा पंतप्रधान भारताचा पंतप्रधान कोण असावा यावर बोलत आहे. इम्रान खान यांना मोदी भारताचे पंतप्रधान व्हावे असं वाटतं?’, आजपर्यंत असे कधीही झालं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
‘अटलजींच्या वेळीही कारगिल युद्ध झालं, मात्र, त्यांनी मोदींसारखा त्याचा कधीही बाजार मांडला नाही’, अशीही कोपरखळी राज यांनी लगावली.
युतीमधल्या शिवसेनेला मत म्हणजे मोदी-शहाला मत
माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राजकारणातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठीची ही निवडणूक आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यामुळे मतदारांनो काळजावर दगड ठेवा आणि मतदान करा. युतीमधल्या भाजप किंवा शिवसेनेला मतदान करणं म्हणजे या दोघांना मतदान करण्यासारखं आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
पाहा व्हिडीओ :