मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी धक्कादायक दावा केला आहे. पुढच्या काही दिवसात दंगली घडवण्याचं काम सुरु होणार आहे. यासाठी ओवेसींबरोबर (एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी) बोलणं झालं आहे. मला सकाळी एक फोन आला होता. तुमची मतं घेण्यासाठी हे सर्व सुरु आहे, असा दावा राज ठाकरेंनी केलाय. सरकारकडे दाखवण्यासारखी कोणतीही गोष्ट उरली नाही, त्यामुळे दंगलीच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जाणार असल्याचं ते म्हणाले.
मुंबईतील विक्रोळीत 23 तारखेपासून सुरु असलेल्या महोत्सवात राज ठाकरेंनी उपस्थिती लावली. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील सर्वांना सावध राहण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. या भाषणात राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समाचार घेतला.
दरम्यान, निवडणुकीच्या काळात दंगली होतील, हा दावा करण्याची राज ठाकरे यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही एका भाषणात राज ठाकरे यांनी या देशात दंगली घडवण्याचा कट सुरु असल्याचं म्हटलं होतं. पुन्हा एकदा त्यांनी याबाबत आपल्याला माहिती मिळाली असल्याचं सांगत हा धक्कादायक दावा केला.
कोण तो टकलू, भगवे कपडे घालून फिरतो. तो मुख्यमंत्री आहे की नाही हेही समजत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली. हनुमान दलित असल्याचं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. त्या वक्तव्याचा समाचार राज ठाकरेंनी घेतला.
जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतही काल विश्व हिंदू परिषदेचा मेळावा झाला. योगी आदित्यनाथ ओवेसींबद्दल काही तरी बोलले. हीच याची सुरुवात आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंनी काल उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जाऊन हिंदीत भाषण केलं. हिंदी बोलायला जमते का, असंही त्यांनी विचारलं आणि शब्द कुठून आले ते माहित नसल्याचंही ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी काल कांदिवलीत आयोजित उत्तर भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. उत्तर भारतीयांचा स्वाभिमान जागा करत त्यांनी यूपी, बिहारच्या मुंबईतील लोकांना काही प्रश्नही विचारले. या भाषणाचं उत्तर भारतीयांकडूनही कौतुक झालं.