विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 2 डिसेंबर 2023 : मनेस अध्यक्ष राज ठाकरे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहेत. वर्षा निवास्थानी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सध्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. राज यांच्यासोबत मनसेचे आमदार राजू पाटीलही आहेत. राज ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागे अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. तसेच या भेटीचे राजकीय अर्थही काढले जात आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळीच वर्षा निवासस्थान गाठले. ही भेट पूर्वनियोजित असल्याचं सांगितलं जात आहे. टोलचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मनसेने मराठी पाट्यांचं आंदोलन हाती घेतलं आहे. अनेक ठिकाणी मनसेचा खळ्ळखट्ट्याक सुरू आहे. राज्यातील सर्व दुकानदारांनी मराठी पाट्या लावाव्यात म्हणून हे आंदोलन सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर ही भेट होत असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत टोलचा मुद्दाही चर्चिला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मनसेच्या टोल आंदोलनानंतर सरकारने टोलबाबत काही निर्णय घेतले होते. पण त्यात अजूनही त्रुटी असल्याचं सांगितलं जात आहे. टोलच्या ठिकाणी महिलांसाठी फिरते शौचालये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण सरकारने हे आश्वासन पूर्ण केलं नसल्याचं सांगितलं जात आहे. टोलच्या संदर्भातील असे अनेक मुद्दे आहेत. त्यावरही या भेटीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, या भेटीत पाच राज्यांच्या निवडणुकांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पाच राज्यात भाजपला मोठं नुकसान सोसावं लागत आहे. देशातील वातावरण काँग्रेसच्या बाजूने जाताना दिसत आहे. त्यावर या भेटीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.