ठाणे : गुढीपाडव्याच्या सभेत शिवतीर्थावरुन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर मंगळवारी ठाण्यातील उत्तरसभेतही राज यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्रात जातीवादाचं विष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच पेरलं गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. तसंच शरद पवार आपल्या भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतात. ते योग्यही आहे. पण ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं म्हणत नाहीत. कारण, त्यांना मुस्लिम मतं दुरावण्याची भीती वाटते, असा घणाघातही राज ठाकरे यांनी केलाय.
राज ठाकरे म्हणाले की, मी जे पवार साहेबांबाबत बोललो की जातीयवाद जो आला तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून. महाराष्ट्रात जात होतीच, हजारो वर्षापासून जात आहे. पण प्रत्येक जातीला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता. 1999 ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला, त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला. आमच्या मुलांची माथी भडकावली गेली. इतिहास चुकीचा सांगितला गेला म्हणे… राष्ट्रवादीने संभाजी बी ग्रेड, सी ग्रेड अशा कुठल्या संघटना काढल्या आहेत. त्या 1999 नंतरच कशा आल्या? हा योगायोग नाही यांनीच काढल्या, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पवारांवर जोरदार निशाणा साधला.
पुण्यात शरद पवारांना प्रश्न विचारला होता आजही काढून बघा. त्याचं वय पाहता मी जास्त खोलात गेलो नाही. पण राष्ट्रवादीच्या जन्मापासून शरद पवार ज्या ज्या वेळी भाषण करतात तेव्हा म्हणतात की शाहू, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र… मान्यच आहे. पण त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. पण पवारसाहेब कधीही कुठल्याही सभेत छत्रपतींचं नाव घेताना दिसणार नाहीत. कारण छत्रपतींचं नाव घेतलं आणि मुस्लिम मतं गेली तर काय करायचं? आणि मग छत्रपतींवर राजकारण करायचं असेल, जातीवर राजकारण करायचं असेल, माझ्या महाराष्ट्रातील तरुणांची, बंधु-भगिनींची माथी भडकवायची असतील तर मग दुसरं कुणीतरी पुस्तकं लिहिलं, ब्राह्मणांनी पुस्तकं लिहिली, मग अजून कुणीतरी काहीतरी लिहिलं.
पवार साहेबांचं एक भाषण पाहिलं. अफलखानाचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला त्यात हिंदू-मुस्लिम असा काही वाद नव्हता म्हणे. मग पवारसाहेब तो कशासाठी आला होता? तो केसरी टूर्स आणि विणा वर्ल्डचं तिकीट घेऊन आला होता का महाराष्ट्र दर्शन करायचं म्हणून? छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा हातात भगवा ध्वज घेतला होता. हिरव्या झेंड्याविरुद्धची भगव्या झेंड्याची लढाई तुम्हाला कधी दिसली नाही का? पवार साहेब स्वत: नास्तिक आहेत. ते क्वचितच कुठल्या मंदिरात हात जोडताना दिसतील. मग ते त्यांच्या पद्धतीनं राजकारण समजवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना अपेक्षित असलेलं. मग त्यात बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला, कोणत्या पानावर कोणत्या ओळीत सांगितला ते सांगा ना. यांचे इतिहासकार कोण तर कोकाटे.. कोण कोकाटे? शिवाजी महाराजांचा इतिहास अनेकांनी लिहिला. पण घराघरात शिवाजी महाराज कुणी पोहोचवले असतील तर ते आमचे बाबासाहेब पुरंदरे. हे नाकारून चालणारच नाही तुम्हाला. पण आम्हाला इतिहास नाही तर ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसाने लिहिलं ते पाहायचं आहे.
संबंधित बातम्या :