मुंबई : निवडणूक संपली असली तरी कुरघोडीचं राजकारण सुरुच (Raj Thackeray vs Uddhav Thackeray) आहे. कारण बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच 23 जानेवारीला मनसे आणि शिवसेना दोघांचंही शक्तिप्रदर्शन दिसणार आहे. मनसेनं अधिवेशनाची घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेनंही वचनपूर्ती सोहळ्याचं आयोजन केलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी रोजी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून मनसेनं पहिल्या अधिवेशनाची घोषणा केली. विशेष म्हणजे 13 वर्षात पहिल्यांदाच मनसेनं अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात मनसेची पुढची दिशा काय असेल आणि भाजपसोबत युतीच्या चर्चेवरही मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार आहेत.
मात्र आता 23 जानेवारीलाच मुंबईत शिवसेनेनंही वचनपूर्ती सोहळ्याची घोषणा केली आहे. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सत्कार केला जाणार आहे.
विशेष म्हणजे महिनाभर आधीच स्वत: राज ठाकरेंनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत 23 तारखेच्या अधिवेशनाची घोषणा केली होती. मात्र 23 तारखेलाच उद्धव ठाकरेंचा सत्कार समारंभ ठेवून, सेनेनं मनसेवर कुरघोडीचाच प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नात्यानं भाऊ आहेत. ते दोघेही राजकारणात असले. तरी दोघांच्या वाटा वेगवेगळ्या आहेत. एक जण मुख्यमंत्री आहे. तर दुसरा राजकीय अस्तित्वाची लढाई लढतोय. त्याचीच झलक एकाच वेळी 23 तारखेला महाराष्ट्राला दिसणार (Raj Thackeray vs Uddhav Thackeray) आहे.