मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मशीदीवरील भोंग्यांचा मुद्दा पुन्हा तापला आहे. कालच राज ठाकरेंची (Raj Thackeray) औरंगाबादेतल्या सभेवरून पुन्हा सरकारला इशारा दिला. त्यानंतर आता मनसे नेते गृह विभागाच्या (Dilip Walse Patil) टार्गेटवर आले आहेत. पोलिसांकडून (Maharashtra Police) मनसे नेत्यांना नोटीसा बजवण्यात आल्या आहेत. मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांना पोलिसांनी नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. ही नोटीस जुन्या प्रकरणात बजवल्याचेही सांगण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी काल औरंगाबादेत बोलताना, मी ईदपर्यंत वाट पाहणार आहे, नंतर मात्र ऐकणार नाही भोंगे उतरले पाहिजेत म्हणजे पाहिजेतच, असा इशारा सरकारला दिला. तसेच भोंगे नाही उतरले तर ईदच्या दुसऱ्या दिवशीपासून अजानवेळी हनुमान चालीसा दुप्पट आवाजात सुरू करायची असेही सांगितले. त्यावरूनच आता राज कारण तापलं आहे.
कालच ठाणे पोलिसांनी जुनी प्रकरण तापासण्यास सुरूवात केली होती. त्यात मनसे नेते अविनाश जाधव यांना 2016 तील एका प्रकरणात नोटीस बजवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात गृहविभाग एक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहेत. अविनाश जाधव यांना 2016 च्या गुन्ह्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ही मनसेच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्याता घेण्याची रणनिती असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या नोटीसा बजावल्याच्या चर्चा आहेत. राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून प्रश्न विचारले जात आहे. राज ठाकरेंची औरंगाबादेतील सभाही उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त लावून ही सभा पार पाडली.
राज ठाकरेंनी ईद संपल्यानंतरचा जरी इशारा दिला असला तरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी दुपारीच फेसबुक पोस्ट करत महाआरती रद्द करत असल्याचे सांगितले, तसेच मनसे कार्यकर्त्यांनी कुठेही आरती करू नये असे सांगितले. तर भोंग्याबाबतची भूमिका मी उद्यापर्यंत मांडेन, असेही त्या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यामुळे उद्या राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं आहे. मात्र आता पोलीस एक्शन मोडमध्ये आल्याने याप्रकरणात नवं ट्विस्ट आलं आहे. आता पोलीस या प्रकरणात पुढे काय कारवाई करतील किंवा समीकरणं कशी बदलतील हे येणाऱ्या दिवसात कळेलच.