मुंबई: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पदाधिकारी मेळावा आयोजित केला आहे. राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे पत्रक मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. असं असलं तरी मनसे लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. मनसेची भूमिका जाहीर करण्यासाठी पदाधिकारी मेळावा घेण्यात येत आहे. यात जो आदेश राज ठाकरे देतील तो मान्य असेल असं मनसैनिकांचं म्हणणं आहे.
त्यामुळे संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील रंगशारदा सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे काय भूमिका घेणार?
दरम्यान, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली, तरी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे कोणाला पाठिंबा देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढली आहे. त्यामुळे मनसे राष्ट्रवादी काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहे.
मनसेच्या माघारीने शिवसेना, राष्ट्रवादीच्या गालावर खळी, मतं खेचण्याचा प्रयत्न
दुसरीकडे मनसेची मतं ही शिवसेनेचीच आहेत, त्यामुळे मनसेला शिवसेना हा पर्याय असल्याचा दावा शिवसेना नेते करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणती घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मनसेने नुकतंच पक्षाचा 13 वा वर्धापन दिन साजरा केला. पक्षाच्या 13 वर्षांच्या वाटचालीनंतर अधिकाधिक जागा लढवण्याऐवजी निवडणुकीतूनच माघार घेत असल्याने मनसेच्या ताकदीबाबत अनेकजण शंका उपस्थित करत आहेत. मात्र, लोकसभा निवडणूक न लढण्यामागची राज ठाकरेंची रणनिती आज कळू शकेल.
संबंधित बातम्या
मनसेच्या माघारीने शिवसेना, राष्ट्रवादीच्या गालावर खळी, मतं खेचण्याचा प्रयत्न
राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा देणार?
मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही!