कोल्हापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी अयोग्य असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. “महापुरामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची गरज नाही. राज ठाकरे यांची मागणी संयुक्तिक नाही”, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार गेले दोन दिवस पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापूरमध्ये ठाण मांडून आहेत. पुरामुळे झालेलं नुकसान आणि पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम शरद पवार करत आहेत. शरद पवारांना पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी पवारांनी निवडणुका पुढे ढकलण्याची गरज नाही असं नमूद केलं.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात घोषित होण्याची चिन्हं आहेत. ऑक्टोबर अखेरीस विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका होणे आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्रात महापुराने थैमान घातलं असल्याने, विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकला अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे यांची मागणी काय?
“कोल्हापूर, सांगली, कोकण यासह राज्याच्या अनेक भागात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेता, तिथे मदत आणि पुनर्वसन कामात सरकारी अधिकारी व्यस्त असतील. हे काम लवकर पूर्ण होईल असं दिसतं नाही. त्याला वेळ लागेल. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास या सरकारी अधिकाऱ्यांच्या कामावर त्याचा ताण पडेल. त्यामुळे ही एकूण परिस्थिती लक्षात घेत विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी”, असं राज ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या
जिंकणाऱ्या जागांचा अंदाज कळतो, पावसाचा का नाही? निवडणुका पुढे ढकला : राज ठाकरे