मुंबई: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पानिपतानंतर पूर्णपणे सुस्तावलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) सध्या चांगलीच चर्चेत आहे. मनसेची ‘मराठी बोला, मराठीत व्यवहार करा’, ही चळवळ ही चळवळ कधी नव्हे इतकी यशस्वी ठरताना दिसत आहे. मनसेच्या दणक्यापुढे अॅमेझॉनसारख्या (Amazon) बलाढ्य कंपनीने नमते घेतले. अॅमेझॉनची ही गत पाहून स्विगी, डॉमिनोज यासारख्या फूड चेन्स असणाऱ्या इतर कंपन्यांनीही आपल्या अॅप्लिकेशनमध्ये मराठी भाषेचा पर्याय देण्याच्या हालचाली सुरु केल्या. यानिमित्ताने राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोल आंदोलनानंतर बऱ्याच काळाने आपले नाणे पुन्हा एकदा खणखणीत वाजवून दाखवले आहे. (AMAZON WILL SOON LAUNCH MARATHI LANGUAGE SUPPORT ON ITS PLATFORM FOLLOWING CONTROVERSY IN MAHARASHTRA)
कोरोनाच्या काळात सामान्य नागरिक, व्यापारी आणि अनेक व्यावसायिक शिष्टमंडळांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले होते. या सगळ्याची तेव्हा बरीच चर्चा झाली, पण कालांतराने ती विरुनही गेली. परिणामी त्यामधून मनसेला म्हणावा तसा राजकीय लाभ झाला नव्हता. मात्र, मराठीच्या मुद्द्यावर अॅमेझॉनसारख्या बलाढ्य कंपनीला नमते घ्यायला लावल्याने हे आंदोलन मनसेच्या पुनरुज्जीवनाची नांदी ठरण्याची शक्यता आहे.
अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या या यशस्वी आंदोलनाचे टायमिंग मनसेसाठी निर्णायक ठरू शकते. विधानसभा निवडणुकीनंतर मनसेने आपला झेंडा आणि अजेंडा बदलला होता. आगामी काळात हिंदुत्वाच्या अजेंड्यावर वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ घेतलेली भूमिका वगळता राज ठाकरे यांची मनसे फारशी चर्चेत आली नव्हती. तर दुसरीकडे मनसेने मराठीच्या मुद्दा सोडल्याची चर्चाही सुरु झाली होती. मात्र, अॅमेझॉनविरुद्धच्या आंदोलनामुळे मनसेने आपण मराठीच्या अजेंड्यावर अजूनही कायम असल्याचे दाखवून दिले. पालिकेच्या आगामी निवडणुकीत मनसेला याचा फायदा होऊ शकतो.
सुरुवातीच्या काळात अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या मनसेच्या मागणीची सकारात्मक दखल घेण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात अॅमेझॉनने आपण यावर नक्की काम करु, असे म्हटले होते. पण अनेक दिवस उलटूनही अॅमेझॉनने त्यावर कार्यवाही केली नाही. डिसेंबर महिन्यापर्यंत वाट पाहिल्यानंतर मनसेने अॅमेझॉनविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेतली.
अॅमेझॉन सरळ सांगून ऐकत नसल्यामुळे मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून मुंबईभरात अॅमेझॉनविरोधात फलक लावण्यात आले. यावर ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला होता. अॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेरही हे पोस्टर झळकावण्यात आले होते. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती. तेव्हापासून हा मनसे विरुद्ध अॅमेझॉन हा वाद पुन्हा तापायला सुरुवात झाली.
डिसेंबर महिन्यात मराठी भाषेच्या समावेशाच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक झाल्यानंतर अॅमेझॉनने राज ठाकरे यांना कायदेशीर नोटीस पाठवून स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. याप्रकरणी राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते.
अॅमेझॉनच्या या कृतीमुळे मनसैनिक आणखीनच चवताळले. त्यानंतर मनसेने मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये अॅमेझॉनची कार्यालये आणि गोदामांची तोडफोड करण्याचा सपाटा लावला.
मनसेने खळखट्यॅक सुरु केल्यानंतर अॅमेझॉन याप्रकरणाची गंभीरता लक्षात आली. त्यानंतर अॅमेझॉनने राज ठाकरे यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करत सात दिवसांत अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर लगेचच अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी पर्यायाचा बॉक्स दिसण्यास सुरुवात झाली होती.
अॅमेझॉनला इंगा दाखवल्यानंतर मनसेने आपला मोर्चा पिझ्झा (Pizza) आणि तत्सम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉमिनोजकडे (Dominos) वळवला होता. मात्र, अॅमेझॉनच्या गत पाहून धडा शिकलेल्या डॉमिनोजने राज ठाकरे यांना लगेचच पत्र पाठवून अॅप्लिकेशनमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. अॅमेझॉनसह स्विगी , झोमॅटो नंतर आता डोमिनोजच्या जुबिलियन्ट फूड वर्क कंपनीनेदेखील आपल्या अॅपमध्ये मराठी भाषा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
संबंधित बातम्या:
अखेर मराठी भाषेचा अॅमेझॉन अॅपमध्ये समावेश, मनसेच्या आक्रमक भूमिकेची जेफ बेझोज यांच्याकडून दखल
मनसेच्या इशाऱ्यानंतर जेफ बेझॉस नमले, ‘अॅमेझॉन’मध्ये मराठीच्या समावेशासाठी हालचाली
अॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या ऑफिसवर मनसेची कूच; ‘मराठी’साठी खळ्ळखट्याकचा दिला इशारा
(AMAZON WILL SOON LAUNCH MARATHI LANGUAGE SUPPORT ON ITS PLATFORM FOLLOWING CONTROVERSY IN MAHARASHTRA)