ठाण्यात 12 एप्रिलला ‘राज’गर्जना ! पोलिसांचं एक पाऊल मागे, डॉ. मुस रस्त्यावरच सभेला परवानगी

| Updated on: Apr 07, 2022 | 10:52 PM

तब्बल 10 तास खलबतं चालल्यानंतर पोलिसांनी सभेच्या ठिकाणाबाबत मौन सोडून गडकरी रंगायतन जवळील डॉ. मुस रस्त्यावरच सभेला परवानगी दिली. तसं पत्र पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दिलंय.

ठाण्यात 12 एप्रिलला राजगर्जना ! पोलिसांचं एक पाऊल मागे, डॉ. मुस रस्त्यावरच सभेला परवानगी
राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ठाण्यातील सभा अखेर 12 एप्रिलला होणार आहे. तशी माहिती मनसेकडून देण्यात आलीय. राज यांची ठाण्यातील सभा 9 एप्रिलला होणार होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता 12 एप्रिल रोजी ठाण्यात ‘राज’गर्जना होणार आहे. मनसे नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांच्या सभेला महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून कशा प्रकारे अडवणूक सुरु आहे याचा पाढाच वाचला. सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातलेला चालतो आणि मनसेच्या सभेला परवानगी द्यायची नाही, ही कसली लोकशाही? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला. येत्या 12 एप्रिलला राज ठाकरे या सर्वांची उत्तरक्रिया करतील, असा इशाराही देशपांडे यांनी यावेळी दिलाय. तब्बल 10 तास खलबतं चालल्यानंतर पोलिसांनी सभेच्या ठिकाणाबाबत मौन सोडून गडकरी रंगायतन जवळील डॉ. मुस रस्त्यावरच सभेला परवानगी दिली. तसं पत्र पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दिलंय.

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठीसह हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला. यावेळी राज यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचे आणि मदरशांवर धाडी टाकण्याची भूमिका मांडुन महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर राज यांच्या वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. आव्हाड यांच्या टीकेला मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आव्हाड यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती.

राज ठाकरे सर्व आरोपांना उत्तर देणार

महाविकास आघाडीतील नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीका केली. या आरोपांना उच्तर देण्यासाठी राज ठाकरे यांची 9 एप्रिलला ठाण्यातील मुस रोडवर सभा घेण्याचं ठरवलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर दीर्घ काळाने राज ठाकरे ठाण्यात ही पहिलीच जाहीर सभा होत आहे. त्यामुळे अविनाश जाधव यांच्यासह हजारो मनसैनिक सभा यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. मात्र, पोलिसांनी सभेसाठी होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होईल, असं कारण देत सभेला परवानगी नाकारली होती.

पोलीस एक पाऊल मागे, ठरलेल्या जागीच सभा होणार

राज ठाकरेंच्या या सभेसाठी सुरुवातीला गडकरी रंगायतन समोरील डॉ. मुस रोडवरील रस्ता निश्चित करण्यात आला होता. मनसे नेते नितिन सरदेसाई यांनी बुधवारी त्या ठिकाणाची पाहणीही केली होती. मात्र, पोलिसांनी या रस्त्यावर सभेसाठी परवानगी नाकारल्याने गुरुवारी सकाळी बाळा नांदगावकर यांनीही ठाण्यात भेट देऊन रस्त्यावर टेबल टाकून राज ठाकरे यांची सभा घेण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानंतर आज दिवसभर मनसे आणि पोलिसांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झाल्या. अखेर पोलिसांनी एक पाऊल मागे घेत राज ठाकरे यांच्या सभेला 9 एप्रिल ऐवजी 12 एप्रिल ही तारिख निश्चित केली. तसंच गडकरी रंगायतन येथील डॉ. मूस रस्त्यावरील जागाच नक्की करण्यात आली.

इतर बातम्या :

Video : पंकजा मुंडेंनी तुळजाभवानीकडे मागितला कौल, मनातील इच्छा पूर्ण होणार?

‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’, सुजात आंबेडकरांच्या राज ठाकरेंवरील टीकेला शालिनी ठाकरेंचं प्रत्युत्तर

संजय राऊतांचं जंगी स्वागत! भातखळकर म्हणतात, ओंगळवाणं प्रदर्शन, तर मुनगंटीवार म्हणतात, ‘गजा मारणेचंही स्वागत झालं होतं’