नांदेड: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नांदेडमध्ये जाहीर सभा होत आहे. मात्र या सभेमुळे निवडणूक आयोगाची चांगलीच पंचाईत झाली आहे. आचारसंहिता लागल्यावर राजकीय सभांचा खर्च हा त्या पक्षाच्या उमेदवाराच्या नावावर टाकला जातो, पण महाराष्ट्रात मनसेचा एकही उमेदवार नाही. त्यामुळे नांदेडच्या सभेचा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा असा प्रश्न निवडणूक आयोगाला पडला आहे. त्याचं उत्तरही निवडणूक आयोगाने शोधलं आहे. राज ठाकरे हे कुणाला मतदान करा हे भाषणात सांगतील, त्यानुसार खर्च लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. समजा कुणाला मतदान करायचे हे सांगितले नाही तर निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागवण्यात येणार आहे.
हा सर्व प्रसंग पाहता निवडणूक आयोग नियम आणि अटींच्या कचाट्यात सापडल्याचं दिसून येतं. राज ठाकरे हे आज नेमकं कुणासाठी मत मागणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल.
यापूर्वी मनसेचा वर्धापन दिन असो वा गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना हद्दपार करा असं आवाहन केलं होतं. या दोघांना घालवण्यासाठी ज्याचा फायदा व्हायचा त्याचा होऊ दे, पण भाजपला मतदान करु नका, अशी थेट भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.
दुसरीकडे राज ठाकरे यांनी अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. राज ठाकरेंना महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न स्वत: अजित पवार यांनी केले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या महाआघाडीला फायदा होईल अशी भूमिका यापूर्वी घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे आज थेट आघाडीच्या उमेदवाराचं नाव घेऊन मतदानाचं आवाहन करतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
नांदेडमधील लढत
दरम्यान, राज ठाकरे यांची सभा होत असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात मोदी-शाह यांच्या पक्षाकडून म्हणजेच भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर हे उभे आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून यशपाल भिंगेही आखाड्यात आहेत. त्यामुळे राज ठाकरे अर्थातच अशोक चव्हाण यांच्या बाजूने बॅटिंग करतील हे निश्चित आहे. पण ते प्रत्यक्ष त्यांचं नाव घेऊन मतं मागणार का हे पाहावं लागेल.