मुंबई: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी झालेल्या चर्चेत अमित ठाकरे यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. (Amit Thackeray will get major role fromMNS in upcoming Mahanagarpalika Election)
या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या संवाद साधला. यावेळी राज्याच्या प्रत्येक भागातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर राज ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्व नेत्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले.
‘मनसे’कडून प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रासाठी सरचिटणीस आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची समिती तयार केली जाणार आहे. या सगळ्या समित्यांचा कारभार हाताळण्याची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर सोपविली जाण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मनसेची आणखी एक बैठक होणार आहे.
नवा झेंडा आणि नव्या अजेंड्यासह मनसेचे रिलाँचिंग करतेवेळी अमित ठाकरे पहिल्यांदाच मनसेच्या व्यासपीठावर सक्रिय दिसून आले होते. त्यावेळी अमित ठाकरे यांचे लाँचिंग झाले असले तरी त्यानंतर ते कार्यकर्ते आणि सामान्य लोकांच्या भेटीगाठी वगळता फारसे सक्रिय दिसून आले नव्हते. मात्र, आता महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने त्यांच्यावर थेटपणे एखादी जबाबदारी टाकली जाईल. त्यामुळे आता अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. राज ठाकरे हे काल (सोमवारी) संध्याकाळी टेनिस खेळत होते. त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. ही दुखापत काळजी करण्याइतकी मोठी नाही. त्यांनी तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यांच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताला सपोर्टर लावलं आहे.
संबंधित बातम्या:
अमित ठाकरेंची आणखी एक मागणी मान्य, बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ
अमित ठाकरेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी बारा तासात पाळला
(Amit Thackeray will get major role fromMNS in upcoming Mahanagarpalika Election)