मनोज लेले, प्रतिनिधी, रत्नागिरी : एकनाथ शिंदेंनी बंड केलं. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एक एक करत आमदार खासदार शिंदेगटाच्या बंडात सामील झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेना पक्ष (Shivsena), धनुष्यबाण चिन्ह यावरून झालेला वाद अवघा महाराष्ट्र जाणतो. ठाकरेंच्या शिवसेनेत अस्थिर वातावरण आहे. आणखी काही नेते ठाकरेंना सोडून शिंदेगटात सामील होण्याची चर्चा आहे. अशातच शिवसेना ठाकरेगटाच्या एका नेत्याने मरेपर्यंत शिवसेनेत राहण्याचा शब्द दिलाय.
शिवसेना उपनेते ठाकरे गट आणि आमदार राजन साळवी यांनी कायम शिवसैनिक म्हणून राहणार असल्याचा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला आहे. माझी निष्ठा कायमस्वरूपी बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशीच आहे.मी मरेपर्यंत शिवसैनिक म्हणूनच आहे. कुठंही जाणार नाही, असं राजन साळवी म्हणालेत.
राजन साळवी यांना नाणार प्रकरणी धमकी देण्यात आली होती. त्यावरही साळवी बोलले. मला नाणार प्रकरणात धमकी आली होती. त्यानंतर पोलीस, एसआयडी यांनी रिपोर्ट दिला. आता मला केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांची सुरक्षा आहे, असं राजन साळवी म्हणाले आहेत. माझी आधी देखील सुरक्षा होती. आता मला एसकोर्ट पुन्हा दिला आहे. मला धमकी दिल्यानंतर सुरक्षा दिली गेली, मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुरक्षेबाबत पत्र दिले होतं, असंही राजन साळवी म्हणालेत.
सरकारने माझी सुरक्षा काढली. तर शिवसैनिक माझी काळजी घेतील, असं राजन साळवी म्हणालेत.
मी शेवटच्या क्षणापर्यंत राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघातील लोकांची सेवा करतील. मी रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, असं राजन साळवी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.