अशोक गहलोतांचं एक पाऊल उलटं? काँग्रेसच्या टार्गेटशीच हातमिळवणी! 3 कारणं महत्त्वाची!

| Updated on: Oct 08, 2022 | 5:02 PM

अशोक गहलोत आणि गौतम अदानी यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बराच वादंग झाला. मात्र आपण गुंतवणुकीसाठी हा करार केल्याचं स्पष्टीकरण गहलोत यांनी दिलं.

अशोक गहलोतांचं एक पाऊल उलटं? काँग्रेसच्या टार्गेटशीच हातमिळवणी! 3 कारणं महत्त्वाची!
Image Credit source: social media
Follow us on

जयपूरः काँग्रेस अध्यक्ष पदाची संधी आणि राजस्थानचं मुख्यमंत्रीपद या दोन्ही डगरींवर हात ठेवणं अशोक गहलोतांना (Ashok Gehlot) चांगलंच भोवलं. राजस्थान (Rajasthan) ते दिल्लीत झालेलं नाट्य अवघ्या देशानं पाहिलं. पक्ष नेतृत्वाची नाराजीही ओढवली. राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार, याचा फैसला येत्या काही दिवसातच होईल. पण अशातच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या (Congress) धोरणांविरोधात आणखी एक कृती केली. टीकाकारांच्या नजरेतून ही कृती सुटली नाही. अखेर गहलोत यांना यावर स्पष्टीकरणही द्यावं लागलं.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शुक्रवारी देशातील महत्त्वाच्या औद्योगिक घराण्यांशी हातमिळवणी केली. विशेष हे की यात गौतम अदानींचाही समावेश आहे.

हे तेच अदानी आहेत, जे राहुल गांधींच्या नेहमीच टार्गेटवर असतात. मोदी, अदानी आणि अंबानी या तिघांमुळे देशात प्रचंड आर्थिक विषमता निर्माण होत असल्याचं राहुल गांधी सांगत असतात.

मात्र जयपूर येथील इन्व्हेस्ट राजस्थान समिट २०२२ येथे गहलोत यांनी अदानी यांच्याशी हातमिळवणी केली. एवढंच नाही तर त्यांची स्तुतीदेखील केली.

याच हातमिळवणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या धोरणांविरोधात वागल्याने अशोक गहलोत यांना नेमकं काय साधायचंय, असा सवाल विचारला जातोय.

3 कारणं महत्त्वाची-

1. अशोक गहलोत चार वर्षांपासून राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर आहेत. आता त्यांच्याकडे एकच वर्ष शिल्लक आहे.

राजस्थानचा राजकीय इतिहास पाहिला तर एकदा भाजप आणि एकदा काँग्रेसचा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना पुढील कार्यकाळ सोडायचा नाहीये. त्यासाठीच जनतेकरिता त्यांनी हा गुंतवणुकीचा मोठा निर्णय घेतला असला.ा

2. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीकडून नुकतीच एक आकडेवारी जाहीर झाली आहे. यात सप्टेंबर २०२२ मध्ये राजस्थानात सर्वाधिक बेरोजगारी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकारने गुंतवणूकदारांसोबत हातमिळवणी करत १० लाख लोकांना रोजगार देण्याची योजना आखली असावी.

3. अशोक गहलोत यांनी राजस्थानसाठी विक्रमी असे १ लाख ९१ हजार कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय. आतापर्यंतच्या सरकारांच्या तुलनेत हे कईक पटींनी जास्त आहे. या गुंतवणुकीच्या निमित्ताने ११ लाख कोटी रुपयांच्या एमओयू वर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यामुळे राजस्थानच्या खजिन्यात काही पैसा येईल आणि कर्ज कमी होईल, अशी आशा गहलोत यांना आहे.

अशोक गहलोत आणि गौतम अदानी यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बराच वादंग झाला. मात्र आपण गुंतवणुकीसाठी हा करार केल्याचं स्पष्टीकरण गहलोत यांनी दिलं.

दरम्यान, राहुल गांधींनीही यावर प्रतिक्रिया दिली. राजस्थान सरकारने अदानी यांना चुकीच्या पद्धतीने बिझनेस दिला तर मी त्यांच्याविरोधात जाईन. पण तोच निष्पक्षतेने बिझनेस दिला असेल तर माझी काहीच हरकत नाही, असे राहुल गांधी म्हणालेत.