मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘मातोश्री’वर येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Rajasthan CM Ashok Gehlot meet Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उपास्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे आणि अशोक गेहलोत यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. गेहलोत नेमकं ‘मातोश्री’वर कोणत्या कारणासाठी आले होते याबाबतची माहिती समोर आली नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याने अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Rajasthan CM Ashok Gehlot meet Uddhav Thackeray) यांची सदिच्छा भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. महाविकास आघाडीबाबत सोनियांचा कोणता निरोप घेऊन ते उद्धव ठाकरेंना भेटले का अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र स्वत: उद्धव ठाकरे यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलं. अशोक गेहलोत हे मुंबईत आले होते, त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानुसार ही भेट झाली असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
अशोक गेहलोत हे मातोश्री बाहेर आल्यानंतर, राष्ट्रीय माध्यमांनी त्यांना राजस्थानातील बालमृत्यूबाबत विचारणा केली. राजस्थानात सध्या नवजात बालकांच्या मृत्यूचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे अशोक गेहलोत टीकेचे धनी बनत आहेत. मात्र अशोक गेहलोत यांनी याबाबत राजस्थान सरकार गंभीर असल्याचं म्हटलं. त्याचवेळी त्यांनी नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण गुजरात, राजकोट, अहमदाबाद, उत्तर प्रदेश, कानपूरमध्येही असून, भाजप केवळ राजकारण करत असल्याचा आरोप केला.
आदित्य ठाकरे यांचं ट्विट
या भेटीनंतर राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन, या भेटीने आनंद झाल्याचं नमूद केलं. “राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांना भेटून, संवाद साधून आनंद वाटला. महाराष्ट्र आणि राजस्थानमधील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होईल, अशा अर्थाचं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं.
Maharashtra CM Uddhav Thackeray ji hosted Rajasthan CM @ashokgehlot51 ji at our residence this morning. It was a real pleasure to interact with him and we look forward to a great bond & relationship with the Hon’ble CM and the state of Rajasthan. pic.twitter.com/YSrRhFPHXH
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 6, 2020