राजस्थानात गुर्जर आंदोलन पु्न्हा पेटले, भरतपूरमध्ये रेल्वे लाईनवर ठिय्या, अनेक गाड्यांचा मार्ग बदलला

| Updated on: Nov 02, 2020 | 3:19 PM

आरक्षणाच्या मागणीसाठी राजस्थानमध्ये पुन्हा एकदा गुर्दर समाजाचं आंदोलन पेटलं आहे. आंदोलकांनी दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरील रुळ उखडून टाकले आहेत. त्यामुळे रविवारी 40 मालगाड्यांसह 60 रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलण्यात आला.

राजस्थानात गुर्जर आंदोलन पु्न्हा पेटले, भरतपूरमध्ये रेल्वे लाईनवर ठिय्या, अनेक गाड्यांचा मार्ग बदलला
Follow us on

भरतपूर: राजस्थानमध्ये पुन्हा एकदा गुर्जर समाजाचं आंदोलन पेटलं आहे. विजय बैंसला यांच्या घोषणेनंतर गुर्जर समाजातील आंदोलकांनी भरतपूरमध्ये रेल्वे रुळावर ठिय्या देत मार्ग अडवून धरला आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. गुर्जर समाजाला मोस्ट बॅकवर्ड क्लास अर्थात MBC प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गुर्जर समाजानं पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. (Rajasthan: The agitation of Gurjar community intensified, many railway routes were changed)

आंदोलकांनी दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरील रुळ उखडून टाकले आहेत. त्यामुळे रविवारी 40 मालगाड्यांसह 60 रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. हाती आलेल्या माहितीनुसार 220 बसही रद्द करण्यात आल्या आहेत. गुर्जर समाजातील आंदोलकांनी अजूनही दिल्ली-मुंबई रेल्वे मार्ग अडवून धरला आहे. त्याचबरोबर बयाना हिंडौन रोडवरही रास्तारोको करण्यात आला आहे.

यावेळी गुर्जर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारला आमच्याशी चर्चा करायची असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं. आम्ही सरकारकडे जाणार नाही, अशी माहिती गुर्जर समाजाच्या कोअर कमिटीचे सदस्य हरदेवसिंह पाटवा यांनी दिली आहे.

गुर्जर समाजात 2 गट?

गुर्जर समाज यावेळी दोन गटात विभागल्याचं बोललं जात आहे. गुर्जर आरक्षण समितीचे अध्यक्ष हिम्मतसिंह गुर्जर यांचा एक गट आहे. जो राजस्थान सरकारसोबत शनिवारी झालेल्या कॅबिनेट सब-कमिटीत झालेल्या चर्चेत सहभागी झाला होता. या गटाने झालेल्या चर्चेनंतर 14 मुद्द्यांवर आपली सहमती दर्शवली आहे. तर गुर्जर नेते विजय बैंसला यांच्या नेतृत्वातील दुसऱ्या गटाकडून आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.

काय आहेत गुर्जर समाजाच्या मागण्या?

– MBC अंतर्गत आरक्षण देण्यात यावे

– राज्यात सध्या ज्या 15 प्रकारच्या भरती सुरु आहेत, त्यात ५ टक्के आरक्षण मिळावे.

– गुर्जर समाजाच्या मागच्या आंदोलनात ज्यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत करावी

– देवनारायण योजना गुर्जर समाजाला लागू करावी

गुर्जर आंदोलन आणि आंदोलकांचे बळी! 

2006 मध्ये समितीच्या स्थापनेनंतर गुर्जर समाज काही काळ शांत झाला. पण 2007 मध्ये पुन्हा आंदोलन पुकारण्यात आलं. तेव्हा पीपलखेडा पाटोली इथं राज्यमार्गावर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात २८ जणांचा मृत्यू झाला होता. तर २३ मार्ज २००८ मध्ये भरतपूरच्या बयाना इथं गुर्जर समाजाच्या आंदोलकांनी रेल्वे पटरी उखडून टाकली. त्यावेळी पोलिस गोळीबारात ७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आंदोलकांनी दौसा जिल्ह्याच्या सिकंदरा इथं रास्तारोको केला. त्यावेळी २३ आंदोलकांचा मृत्यू झाला होता. हा आकडा 2008 अखेरपर्यंत ७२ पर्यंत जाऊन पोहोचला होता.

महाराष्ट्रातही मराठा समाज आक्रमक

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार गंभीर दिसत नसल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चानं केला आहे. मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ही समिती बरखास्त करून या समितीत नव्या सदस्यांचा समावेश करावा, अशी मागणीही मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे.

संबंधित बातम्या:

मुंबई : राजस्थानच्या गुर्जर आंदोलनाचा मुंबईत फटका, राजस्थानकडे जाणाऱ्या गाड्या रद्द

राजस्थानात गुर्जर समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक, गेहलोत सरकारला १ नोव्हेंबरचा अल्टिमेटम

Rajasthan: The agitation of Gurjar community intensified, many railway routes were changed